साहित्यिकांनी आसूड व्हाः एल.बी. पाटील

| धाटाव | वार्ताहर |

आजचे सबंध देशातील राजकारण गलिच्छ झाले आहे. जातीजातीत, धर्माधर्मात दरी निर्माण केली जात आहे, हे चित्र चांगले नाही. त्या पीडित समाजाच्या, माणसांच्या वेदना मांडल्या पाहिजेत. दुःख मांडण्याची गरज आहे. पण स्वतःला मोठे समजणारे लेखक, कवी काही विचारवंत दुःख मांडत नाहीत, खरच आपण इतके निष्ठुर झालोत का, असा सवाल करत आपल्या कवितेतून अन्याय, जुलमी व्यवस्थेवर आसूड ओढत रहा, आसूड व्हा, बोलणारे शब्द तीच कविता अभिप्रेत आहे. असे विद्रोही प्रतिपादन ख्यातनाम साहित्यिक प्रा. एल बी पाटील यांनी केली.

पुगाव येथे स्व. हरिभाऊ म्हसकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ शंकरराव म्हसकर सामाजिक संस्था आयोजित गंध चंदनाचा ह्या विषयांवरील जिल्हास्तरीय कवी संमेलनात ते बोलत होते. संमेलनाचे उद्घाटन बहुजन समाजाचे नेते शंकराव म्हसकर यांच्या हस्ते झाले. व्यासपीठावर कोमसापचे जिल्हाध्यक्ष सुधीर शेठ, ओबीसीचे जिल्हाध्यक्ष सुरेश मगर, कोमसापचे समन्वयक अ वि जंगम, कोमसापच्या अध्यक्ष संध्या दिवकर, सरपंच नेहा म्हसकर, गडदुर्ग अभ्यासक सुखद राणे, कुणबी युवक अध्यक्ष अनंत थिटे, नरेंद्र जाधव, महेश ठाकूर, रोहा प्रेस क्लबचे अध्यक्ष राजेंद्र जाधव, शिवराम महाबळे, संस्थेचे अध्यक्ष गणेश म्हसकर, सतीश भगत, सुरेश धामणसे, रामदास खामकर, विजय दिवकर, श्रीनिवास थळे, सुधीर शिरसागर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी संस्थेच्या माध्यमातून क्रीडा साहित्याचे वाटप व ग्रंथदिंडी काढण्यात आली. यात शालेय विद्यार्थ्यांनी मोठा सहभाग घेतला.स्व. हरिभाऊ म्हसकर यांचा शताब्दी महोत्सव वर्ष आहे. लोकांच्या आग्रहास्तव संस्थेची स्थापना झाली. त्यातून ग्रंथालय उभे केले. वाचन संस्कृती टिकली पाहिजे. कुणबी उच्चाधिकार समितीला अध्यक्ष असताना कवी केशवसुत यांच्या जन्मगावी मालगुडला गेलो. नंतर बेदखल कुळांच्या प्रश्नाला सुरुवात केली, अशी आठवण सांगत कवितेत ताकद असते. तलवारीपेक्षा धार असते. त्याच लेखणीतून ग्रामीण भागातील प्रश्न सोडविले जावेत अशी भावना शंकरराव म्हसकर यांनी व्यक्त केली.

कोकण मराठी साहित्य परिषदेचे जिल्हाध्यक्ष सुधीर शेठ यांनी पुगांव गावाच्या संस्काराने आम्हाला ऊर्जा दिली, आनंद दिला, शंकरराव म्हसकर यांच्या कार्यातला सेवकपणा जाणवला भविष्यात चांगली चळवळ उभी राहील असे शेठ म्हणाले. शंकरराव म्हसकर यांची उंची किती मोठी आहे याची जाणीव आहे त्यांच्या जीवनातील चंदनाचा गंध दुसऱ्यांना दिला. वाचनालय ही गावाची श्रीमंती असते. म्हसकर यांच्या मागे जावे असेच व्यक्तिमत्व आहे. आजचे राजकारण प्रचंड गलिच्छ आहे. मणिपूरच्या घटनेने मन दुःखी झाले. कुठे गेले कवी ? बोलणारे शब्द का नाहीत, याच निष्ठुर हुकुमशाहवर आसूड ओढा, आसूड व्हा, असे म्हणत प्रा. एल बी पाटील यांनी कवितेतून नरेंद्र मोदी यांच्यावर संतापजनक आसूड ओढले, मस्तीचा सोडतोय धूर, पेरलय मणिपूर असा कवितेतून पाटील यांनी मोदींचा समाचार घेतला. यावेळी उपस्थित कवींनी कविता सादर केल्या. सर्वच मान्यवर, कवींचे म्हसकर पारिवाराचे उत्तम आदरतिथ्य केले. अध्यक्ष गणेश म्हसकर, बबन म्हसकर व महिलांनी उपस्थितांचे स्वागत केले. कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Exit mobile version