तळोजा पाणी समस्याची लोकायुक्तांकडून दखल

| खारघर । वार्ताहर ।

तळोजा परिसरात कमी दाबाने होणार्‍या पाणीपुरवठ्याची दखल लोकआयुक्त विभागाने घेतली आहे. उप लोकआयुक्त यांच्यासमोर 30 डिसेंबरला सुनावणी होणार असून, या वेळी सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक तसेच पाणीपुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी ऑनलाइन उपस्थित राहावे, असे महाराष्ट्र लोकआयुक्त विभागाकडून कळविण्यात आले आहे.

तळोजा वसाहतीत गेल्या काही वर्षांपासून कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्यामुळे रहिवाशांना टँकरने पाणी विकत घेऊन गरजा पूर्ण कराव्या लागत आहेत. वसाहतीमधील पाणी समस्या दूर व्हावी, यासाठी रहिवाशांनी सिडकोच्या विरोधात अनेक वेळा मोर्चा, आंदोलन केले आहे. यावेळी पाण्याचा साठा वाढवून योग्य पुरवठा केला जाईल, असे आश्‍वासन सिडकोकडून देण्यात येते. दोन दिवस सुरळीत पाणीपुरवठा होतो आणि पुन्हा परिस्थिती जैसे थे होत असल्यामुळे रहिवासी नाराज झाले आहेत. तळोजा वसाहतीच्या लोकसंख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे; मात्र सिडकोकडून पाणी वाढीसाठी कोणत्याही प्रकारचे प्रयत्न केले जात नसल्याची बाब लोकआयुक्तांच्या निदर्शनास आणून देण्यात आली आहे.

Exit mobile version