। माणगाव । प्रतिनिधी ।
सुनील तटकरेंनी कोणालाही मोठे केले नाही, केवळ आपल्या कुटुंबातील व्यक्तींनाच मोठे केले. त्यामुळे त्यांची जागा या विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने दाखविण्याची ही योग्य वेळ असल्याची जोरदार टीका मतदार संघातील मविआ पुरस्कृत राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षाचे उमेदवार अनिल नवगणे व ज्ञानदेव पवार यांनी जुने माणगाव येथील गाव बैठकीत बोलताना केली.
श्रीवर्धन विधानसभा मतदार संघाची निवडणूक येत्या 20 नोव्हेंबर रोजी होत असून या निवडणुकीच्या निमित्ताने महाविकास आघाडीचे उमेदवार अनिल नवगणे यांच्या प्रचारार्थ जुने माणगाव मस्जिद मोहल्ला येथे गुरुवारी (दि.14) रोजी गाव बैठक आयोजित करण्यात आली होती. या गाव बैठकीला काँग्रेसचे अध्यक्ष विजय तोडणकर, अब्दुल रहिमान हाजीते, लियाकत परदेशी, सुभाष पारखे, कृष्णा दिवेकर, वैभव पवार, अल्पेश पवार, यासिन परदेशी, सलाम परदेशी, नजीर जामदार, रऊफ जामदार, हाजीमिया परदेशी, अकबर परदेशी, भाया परदेशी, रशीद हाजीते, महम्मदअली धुंदवारे, मजीद ताज, अयुब करवेकर, जावेद नदाफ आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना अनिल नवगणे म्हणाले की, मी महाविकास आघाडीकडून निवडणुकीच्या रिंगणात असून मला आघाडीतील सर्वच पक्षांचा तसेच मित्र पक्षांचा चांगला पाठिंबा मिळत आहे. या मतदार संघातील जनतेला आता बदल हवा असल्याचे दिसून आले आहे. कुणबी समाज, मुस्लिम समाज, बौद्ध समाज यांसह सर्वच समाज बांधवांचा मला पाठिंबा मिळत आहे. या मतदार संघात कोणताही रोजगार मिळत नसल्याने सुशिक्षित बेरोजगार तरुणांमध्ये प्रचंड नाराजी आहे. श्रीवर्धन मतदार संघात आपल्याला विकास कामांबरोबरच रोजगाराची निर्मिती करायची आहे. तटकरेंचा 70 हजार कोटी रुपयांचा भ्रष्टचार मोदींनी बाहेर काढणार असे सांगितल्यावर चौथ्याच दिवशी तटकरे मोदींच्या मांडीवर जाऊन बसल्याची टीका त्यांनी केली आहे.