टेकडीवरून पाय घसरल्याने शिक्षकाचा मृत्यू

। महाड । प्रतिनिधी ।
महाड शहराजवळील चांभारखिंड येथील रहिवासी विकास बाबुराव शिगवण यांचा गावाजवळील टेकडीवरून पाय घसरून पडल्याने दुर्दैवी मृत्यू झाला. दोन दिवसापूर्वी त्यांच्या जागेमध्ये वणवा पसरला होता. त्याची पाहणी करण्यासाठी शुक्रवारी (दि.26) सायंकाळी ते मुलासोबत टेकडीवर गेले असता तेथे त्यांचा पाय घसरून तोल गेल्यामुळे ते दरीत कोसळले.

या अपघातात त्यांच्या डोक्याला व छातीला गंभीर स्वरूपाची दुखापत झाल्यामुळे ग्रामस्थांच्या मदतीने तातडीने त्यांना ग्रामीण रुग्णालय महाड येथे आणले असता तिथे त्यांना मृत घोषित करण्यात आले. विकास शिगवण हे रायगड शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेच्या शाळेत शिक्षक म्हणून काम करत होते.

उत्तम शिक्षक म्हणून त्यांची ख्याती होती. त्यांच्या अकाली निधनामुळे चांभारखिंड गावावर त्याचप्रमाणे महाड तालुका शिक्षण क्षेत्रात शोककळा पसरली आहे. याप्रकरणी महाड शहर पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची अशी नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

Exit mobile version