। तळा । वार्ताहर ।
कुणबी भवन तळे येथे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती शाखा आयोजित आदर्श शिक्षक व गुणवंत विद्यार्थी सन्मान सोहळा नुकताच मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. सर्वप्रथम सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे कोकण विभाग संपर्क प्रमुख सुधीर सपकाळ यांची सर्वानुमते निवड करण्यात आले. नंतर व्यासपीठावरील सर्व मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन करण्यात आले.
तसेच मान्यवर महिला व बालकल्याण सभापती गीता जाधव, पंचायत समिती सभापती अक्षरा कदम, जिल्हा परिषद सदस्य तथा पक्ष प्रतोद बबन चाचले, उपसभापती गणेश वाघमारे, माजी सभापती चंद्रकांत रोडे, कोकण विभाग संपर्कप्रमुख सुधीर सपकाळ, रायगड जिल्हा सरचिटणीस अनिल नागोटकर, सुरेश चव्हाण आदी मान्यवरांच्या पुष्पगुछ व पुस्तके देऊन सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक तळा तालुका अध्यक्ष विजय येलवे यांनी केले. जगदीश कासे, विजय पवार यांनी आपले मनोगत व्यक्त केले. नागोठकर, राजेश जाधव यांनी आपल्या मार्गदर्शन तर भाषणात जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक हे स्वतः आदर्श आहेतच पण भावी पिढी आदर्श करण्याचे ईश्वरी कार्य ते प्रामाणिकपणे करीत आहेत. त्यामुळे स्पर्धा परीक्षांमध्ये मोठ्या संख्येने विद्यार्थी यशस्वी होत आहेत असे सांगितले.