| रेवदंडा | वार्ताहर |
नेहरु युवा केंद्र संघटन, रायगड-अलिबाग आणि ओएसिस बहुउद्देशीय समाजाभिमुख संस्था, रेवदंडा-अलिबाग-रायगड यांच्या संयुक्त विद्यमाने मुरुड तालुक्यातील मांडला येथे सद्भावना दिवस साजरा करण्यात आला. यानिमित्ताने आयोजित परिसंवादात कार्यक्रम अध्यक्षाच्या भूमिकेतून मार्गदर्शन करताना मांडला पंचायतीच्या माजी सरपंच साक्षी गायकवाड यांनी जगाला सद्भावनेची शिकवण भारताकडून मिळाली असल्याचे प्रतिपादन केले आहे.
गायकवाड म्हणाल्या की, या महनीय राष्ट्रात जन्मलेल्या भगवान बुद्धांनी सर्वप्रथम जगाला सद्भावनेची शिकवण दिली. त्यानंतर ते कार्य अनेक तथागत बुद्ध, साधूसंत, महंत आदींनी केले. आपल्या देशात विविधतेत एकता आहे, ती या सद्भावनेमुळेच. मात्र, राजकीय आकस, धर्मांधपणा आणि स्वार्थी वृत्ती यामुळे देशातील सद्भावनेचा लोप होत असल्याची खंत व्यक्त करत, देशातील युवा वर्गाने सद्भावनेचे संवर्धन तथा तिचा प्रचार-प्रसार यासाठी प्रयत्नशील होण्याचे आवाहनदेखील साक्षी गायकवाड यांनी केले. याप्रसंगी व्यासपीठावर ओएसिस संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रतिक कोळी, कार्याध्यक्ष यज्ञेश पाटील, विघ्नहर्ता स्पोर्ट्स क्लबचे प्रशिक्षक दर्श नागोठकर, राष्ट्रीय युवा स्वयंसेवक अक्षता सोडेकर हे मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात भगवान बुद्ध यांच्या वंदनाने करण्यात आली. त्यानंतर प्रमुख मार्गदर्शक युवा सामाजिक कार्यकर्ते यज्ञेश पाटील यांचे नेतृत्वांतर्गत ‘सद्भावना : जागतिक पटलावर भारताचे योगदान’ या विषयावर परिसंवाद संपन्न झाला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ओएसिस संस्थेचे अध्यक्ष प्रतिक कोळी, सूत्रसंचालन सार्थक गायकवाड, तर आभार प्रदर्शन विघ्नहर्ता स्पोर्ट्स क्लबचे प्रशिक्षक दर्श नागोठकर यांनी केले