अश्रू थिजले अन् परतीची आशाही मावळली

तळीयेतील शोधकाम थांबविले
31 जण ढिगार्‍याखालीच
महाड | प्रतिनिधी |
रिकाम्या चिखलमय झालेल्या त्या ढिगार्‍यांकडे पाहताना डोळ्यातील आसूही सुकून गेले,ज्यांच्यासमवेत आयुष्य घालविले ते जीवाभावाचे सारेजण या धरतीच्या पोटात कुठे गडब झाले हे कुणालाच समजले नाही.तळीये मधील जिवंत राहिलेल्या प्रत्येकाची अशी शोकमग्न अवस्था सार्‍यांचेच मन हेलावून टाकणारी होती.आजही त्या कोसळलेल्या मातीच्या ढिगार्‍यांकडे पहात अनेकजण तो नक्की परत येईल या वेड्या आशेवर आहेत.पण अश्रू थिजले अन् परतीची आशाही मावळली अशी अवस्था तळीयेवासियांची झालेली आहे.
रायगड जिल्ह्यातल्या तळीये इथे दरड कोसळल्याने झालेल्या दुर्घटनेत आत्तापर्यंत 53 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. ढिगार्‍याखाली गाडल्या गेलेल्या मृतदेहांना बाहेर न काढता तिथेच अंत्यसंस्कार करण्याची मागणी ग्रामस्थ आणि स्थाानिक लोकप्रतिनिधींकडून मोठ्या प्रमाणावर होत होती. मात्र, शासन शोध आणि बचाव कार्य थांबवण्यास तयार नव्हतं. पण आता येथील शोध आणि बचाव मोहीम थांबवण्याचा निर्णय अखेर प्रशासनाने घेतला आहे.
तळीये इथं आत्तापर्यंत 53 नागरिकांचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली होती. काल दिवसभरात 11 मृतदेह सापडले असले तरी 31 जण मात्र ढिगार्‍याखाली अडकल्याचं सांगितलं जात होतं. या अडकलेल्या नागरिकांना मृत घोषित करा आणि त्यांना बाहेर काढू नका अशी मागणी या गावातले नागरिक, मृतांचे नातेवाईक आणि स्थानिक लोकप्रतिनिधी करत होते. त्यामुळे आता शोध आणि बचाव मोहीम थांबवत त्या 31 बेपत्ता नागरिकांना मृत घोषित करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.
ढिगार्‍याखाली या मृतदेहांचं विघटन सुरु झाल्यामुळे त्यांना बाहेर काढणं आणखी कठीण होणार आहे. ते पाहून त्यांच्या नातेवाईकांना अधिकच दुःख आणि वेदना होतील. त्यामुळे त्यांना बाहेर न काढणंच योग्य असल्याची भावना मृतांच्या नातेवाईकांनीही व्यक्त केली होती. गावातले लोकप्रतिनिधी आणि मृतांच्या नातेवाईकांनी आता मृतदेहांची अधिक विटंबना न करता त्यांना मृत घोषित करुन मृत्यू प्रमाणपत्र आणि इतर दस्ताऐवजांची पूर्तता शासनाने करावी अशी मागणी केली होती.
मात्र, जिल्हाधिकार्‍यांनी बचाव आणि मदतकार्य सुरुच ठेवण्याची भूमिका घेतली होती. गावातल्या सगळ्या नागरिकांनी जरी विरोध केला तरी हे काम सुरुच ठेवणार असल्याचं त्यांनी सांगितलं होतं. एकूण एक बेपत्ता व्यक्ती जोपर्यंत सापडत नाही, तोपर्यंत हे मदत आणि बचावकार्य सुरुच राहील, अशी भूमिका जिल्हाधिकार्‍यांनी मांडली होती.

Exit mobile version