चौल परिसरात इतिहासाची साक्ष देणारी मंदिरे

कुडेश्‍वर मंदिराचे पर्यटकांना आकर्षण
| रेवदंडा | प्रतिनिधी |
चौल मध्ये ऐतिहासीक काळापासून प्रसिध्दीस असलेली असंख्य मंदिरे पहावयास मिळतात, चौलच्या वैभवशाली इतिहासाची साक्षीदार असलेली मंदिरे आजही पर्यटक व भाविक यांचे आकर्षण ठरत आहेत. चौलचे श्री कुडेश्‍वर मंदिर त्यापैकीच एक असून हे मंदिर जागृत देवस्थान व भक्ताचे श्रध्दास्थान आहे.

चौल नाक्यापासून काही अंतरावर मुख्यः रस्त्यावरून जाखमाता मंदिराचे येथून गल्लीत अर्धा किमी अंतरावर कुडेश्‍वर मंदिर आहे. नारळ पोफळीच्या बागाच्या सानिध्यात वसलेले मंदिरातील शांत व सुखद वातावरण मनाला समाधानाचा स्पर्श करतो. येथील रमेश गोंविद म्हात्रे यांच्या मालकी हक्कामध्ये असून कुडेश्‍वर मंदिर परिसरातील ग्रामस्थ मंदिराची देखभाल व पुजाअर्चा करतात. चौपाखी कौलारू जुन्या पध्दतीचे या मंदिराचे बांधकाम व ठेवण पाहिल्यास हे मंदिर निश्‍चितपणे इतिहासकालीन असल्याचे जाणवते. मंदिराचे समोरच प्रशस्त पटांगण असून समोरच स्मरणार्थ बांधलेली उंच असा दिपस्तंभ आहे. मंदिरातील समोरील पायर्या चढून गेल्यावर दरवाज्याने आत प्रशस्त सभागृह प्रवेश होतो.

या सभागृहातील भिंतीवर येथील ग्रामस्थांचे विविध फलक लावलेले आहे. या प्रशस्त सभागृहात दगडी नंदी असून या नंदीस नमस्कार करून पुढे मंदिराच्या मुख्यः गाभार्‍याकडे जाता येते. या मंदिराच्या गाभार्‍याच्या समोरील उजव्या बाजूस श्री मारूती रायांची मूर्ती व डाव्या बाजूस श्री गणरायाची मूर्ती स्थानापन्न झालेली दिसते. मंदिराच्या गाभार्‍यातून प्रवेश करतानाच् समोर श्री शंकराची भली मोठी पिंड दिसते. या पिंडीसमोर उभा असलेला नाग असे दृश्य पाहून भाविक भक्ती व श्रध्देने निश्‍चित नतमस्तक होतो. परिसरात अनेक श्री शंकराची मंदिरे पहाण्यास येतात, परंतू श्री कुडेश्‍वर मंदिरातील पिंडीचा आकार फारच मोठा आहे. काही वर्षापुर्वी या पिंडीचा आकार आपोआप वाढू लागल्याने या पिंडीवर खिळा मारून वाढणारा आकार थांबविण्यात आला अशी आख्यायिका येथील ग्रामस्थांनी सांगितली.

त्यामुळे चौलचे श्री कुडेश्‍वर मंदिर हे जागृत देवस्थान मानले जात असून हे श्री कुडेश्‍वर मंदिर भाविकांचे श्रध्दा व भक्तीचे स्थान बनले आहे. येथे दर महाशिवरात्रीला स्थानिक ग्रामस्थ एकत्रीत येवून उत्सव साजरा करतात तर श्रावण महिन्यातील एक सोमवार या मंदिरात पारायण असते. महाशिवरात्रीचे दिवशी या मंदिरात पंचक्रोशीतील भाविक श्री कुडेश्‍वराच्या दर्शनाचा लाभ घेतात. दर श्रावणाच्या दर सोमवारी येथे मोठी गर्दी भाविक करीत असतात. एक ऐतिहासिक मंदिर म्हणून पर्यटक नित्य या मंदिरास भेटी देतात. श्री कुडेश्‍वर मंदिराचा जिर्णोध्दार कै. अनंतराव वसईकर यांनी काही वर्षापुर्वी केला. परंतू या मंदिराचा पुनस्यः जिर्णोध्दार करण्याचा मनोदय येथील ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत. हे मंदिर ऐतिहासिक आहे, परंतू कोणी व केव्हा बांधले यांचा लिखीत स्वरूपात सापडत नाही.

Exit mobile version