एस.टी. बस मधील अनेक प्रवासीही किरकोळ जखमी
| नागोठणे | वार्ताहर |
मुंबई-गोवा महामार्गावर नागोठण्याजवळील निडी येथे एस.टी. महामंडळाची महाड-बोरिवली बस व पेणवरून महाडकडे घरगुती सामान घेऊन जाणारा टेम्पो यांच्यात झालेल्या अपघातात टेम्पो चालकाचा गंभीर जखमी झाल्याने जागीच मृत्यू झाला आहे. तर टेम्पोतील अजून एक वृध्द व्यक्ती व महिला गंभीर जखमी झाली आहे. मृत टेम्पो चालकाचे नाव विकास विश्वास सुतार (वय 30) असे असून तो महाड तालुक्यातील वडवली गावातील राहणारा आहे. निडी येथील इन्फिनिटी गॅसेस या कंपनी समोरील महामार्गावर सायंकाळी 4.45 वा. सुमारास हा अपघात घडला. या अपघाताची माहिती तातडीने कोंडगाव ग्रामपंचायतीचे माजी सरपंच निडी येथील निखिल मढवी यांनी पोलिसांना दिली.
सुमारे 13 वर्षाहून अधिक काळ रखडलेल्य मुंबई गोवा महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम सध्या नागोठणे हद्दीत जोरात सुरु आहे. येथील निडी गावच्या हद्दीतही हे काम सुरु असून दोन्ही लेनचे काम जवळजवळ पूर्ण झाले आहे. असे असूनही महामार्ग प्राधिकारणाने हॉटेल कामत गोविंदापासूनची एक लेन बंद ठेवली आहे. त्यामुळे दुस-या लेनवरूनच जाणा-या येणा-या गाड्यांची वर्दळ महामार्गावर सुरू आहे. त्यातच आज रविवार असल्याने महामार्गावर वाहनांची गर्दी वाढल्याने एकाच लेनवरुन सुरू असलेल्या वाहतूकीमुळे दोन्ही वाहनचालकांना अंदाज न आल्याने हा अपघात घडल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
या अपघातात टेम्पोतील गंभीर जखमी महिला व एक वृध्द व्यक्तीला नागोठण्यात डॉ. सुनिल पाटील यांच्या मायालक्ष्मी हॉस्पीटलमध्ये प्राथमिक उपचार करुन पुढील उपचारासाठी पनवेल येथील रुग्णालयात नेण्यात आले आहे. एस.टी.बसमधील काही किरकोळ जखमी प्रवाशांवर नागोठणे प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले. या अपघाताची माहिती मिळताच नागोठणे पोलिस ठाण्याचे सपोनि. हरेष काळसेकर यांनी पोलिस पथकासह घटनास्थळी धाव घेऊन प्रवाशांना रूग्णालयात दाखल केले. तसेच, महामार्गावरील वाहतूक तातडीने सुरळीत केली.