। पोलादपूर । प्रतिनिधी ।
पोलादपूर ग्रामीण रुग्णालयाच्या समोरील मुंबई- गोवा राष्ट्रीय महामार्गावर बुधवारी (दि.9) पहाटे चार वाजण्याच्या सुमारास अपघात झाल्याची घटना घडली आहे. एका उभ्या असलेल्या आयशर टेम्पोला मागील बाजूने अशोक लेलँड आयफाय टेम्पो येऊन जोरदार धडकला. या अपघातात लेलँडचा क्लीनर जागीच ठार झाला तर चालक किरकोळ जखमी झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, पोलादपूर येथे मुंबईकडून गोव्याकडे जाणाऱ्या मार्गीकेवर मध्य प्रदेश येथील आयशर टेम्पो चालक बळीराम सोलंकी (46) याने कोणत्याही प्रकारच्या सांकेतिक पार्किंग लाईट न लावता धोकादायक स्थितीत टेम्पो उभा केला होता. यावेळी अशोक लेलँड बडा दोस्त आयफाय टेम्पो घेऊन तक्रारदार चालक मल्लिकार्जुन ढवण (59) रा. सांगली मुंबईकडून गोव्याकडे चालला असताना आयशर टेम्पोला धडकला. या अपघातात अशोक लेलँड टेम्पोचा चालक मल्लिकार्जुन ढवण हा जखमी झाला तर त्याच्यासोबतचा क्लीनर ताराचंद विहापूरे (47 ) हा लेलँड टेम्पोचा पुढचा भाग आयशर टेम्पोच्या मागील भागावर धडकून पूर्णपणे आत चेपला गेल्याने जागीच ठार झाला. हा अपघात झालेल्या ठिकाणी यापूर्वी देखील अनेक अपघात झालेले आहेत. या घटनेची माहिती मिळताच श्रीकाळभैरवनाथ रेस्क्यू टिम आणि पोलादपूर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून अशोक लेलँड टेम्पोचा चालक ढवण आणि मयत विहापुरे यांना नुकसानग्रस्त टेम्पोच्या बाहेर काढण्यास सहकार्य केले. याप्रकरणी आयशर टेम्पोचा चालक बळीराम सोलंकी याच्या विरुद्ध गुन्हा पोलीस हवालदार टी.टी. सुतार यांनी दाखल केला असून, पोलीस उपनिरीक्षक पवार हे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास करीत आहेत.






