भीषण अपघात! उभ्या ट्रकला मोटारसायलची धडक; एकाचा मृत्यू

। माणगाव । प्रतिनिधी ।

माणगाव – मोर्बा मार्गावर उभ्या असलेल्या ट्रकला पाठीमागून मोटारसायकलची जोरदार धडक लागली. या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी (दि.11) सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास माणगाव गावच्या हद्दीत द्वारका हॉटेलच्या पुढे अंधारात घडली. याबाबतची फिर्याद सुनील रमेश दिवेकर (वय 36, रा.रिळे ता.माणगाव) यांनी माणगाव पोलीस ठाण्यात दिली.

मिळालेल्या माहितीनूसार, आरोपी किरण नरसिंग जगताप (वय 44, रा.अंबाले राजेवाडी ता.पुरंदर जि.पुणे) यांनी त्याच्या ताब्यातील ट्रक क्रमांक एम.एच.12 आर.एम. 9572 हि गाडी रहदारीस अडथळा होईल अशी धोकादायकरीत्या उभी केली होती. अंधारात ट्रक न दिसल्यामुळे पाठीमागून येणारे राजू रमेश दिवेकर (वय 38, रा.रिळे ता.माणगाव) यांची एम.एच.06 बी.सी 3561 या गाडीची ट्रकला जोरदार धडक लागली.

या अपघातात दुचाकीस्वार राजू दिवेकर यांना गंभीर दुखापत झाली. त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. मात्र त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी माणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिकारी आस्वर अधिक तपास करीत आहेत.

Exit mobile version