। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
अलिबाग-रेवदंडा मार्गावर आरसीएफ कॉलनीजवळ उंडीचे भाट परिसरात भीषण अपघात झाला. मोटारसायकल आणि इनोव्हा कारमध्ये झालेल्या या अपघातात नागाव येथील इसम गंभीर जखमी झाला असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा अपघात बुधवारी सायंकाळी सातच्या सुमारास घडला. सदर अपघाताचे वृत्त कळताच वाहतूक पोलिसांसह अलिबाग पोलिस घटनास्थळी दाखल होत तातडीने जखमीला रुग्णालयात हलविण्याची कार्यवाही करुन वाहतूक सुरळीत केली.
अमित सावंत असे या अपघातात जखमी झाल्याचे नाव आहे. तो अलिबागहून नागावला जात होता. त्याचवेळी मुरुडहून अलिबागकडे जाणार्या एमएच.01. बीजी. 0785 या क्रमांका इनोव्हा कार आणि स्पेलेंडर दुचाकी यांच्यर्चीं जोरदार ठोकर झाली. या भिषण अपघातात दुचाकीवरील अमित सावंत राहणार नागाव हा गंभीर जखमी झाला. त्याच्या डोक्याला तसेच पायाला मोठी दुखापत झाली आहे. घटनास्थळी आलेल्या पोलिसांनी तात्काळ रुग्णवाहीका बोलावली मात्र रुग्णवाहीका पोहचायला उशिर होत असल्याने नातेवाईकांनी टेम्पो आणून त्यात जखमीला तात्काळ रुग्णालयात हलविले. यावेळी वाहतूक पोलिस हवालदार थळे, महेश पाटील, पोलिस नाईक म्हात्रे, मितेश म्हात्रे, मगर आदी कर्मचार्यांनी यात मोलाचे सहकार्य केले. या अपघातामुळे मोठी वाहतूक कोंडी झाली होती. त्यावर पोलिसांनी नियंत्रण मिळवत वाहतूक सुरळीत केली.