मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात

ट्रेलरच्या धडकेत दोन जण ठार, एक गंभीर
सुकेळी | वार्ताहर |
मुंबई-गोवा महामार्गावर कानसई गावाच्या हद्दीमध्ये हॉटेल बिजलीच्या समोरच ईरटीगा गाडीमधून रस्त्याच्या बाजूला लघुशंखेसाठी उतरलेल्या तिघांना ट्रेलरची जोरदार धडक बसून भीषण अपघात झाला. या अपघातात दोन जण ठार, तर एक गंभीररित्या जखमी झाला आहे. हा अपघात गुरुवार (दि.13) रोजी सकाळी 7.05 च्या सुमारास घडला.
याबाबतीत उपलब्ध झालेल्या माहितीनुसार, मुंबई-गोवा महामार्गावरून ठाणे येथून मालवणला जाणारी ईरटीगा गाडी क्र. एमएच 04 जीजे 9698 ही नागोठणेच्या पुढे असलेल्या कानसई गावाच्या हद्दीमध्ये असलेल्या हॉटेल बिजलीच्या समोर आली असता ईरटीगा गाडी रस्त्याच्या बाजूला उभी करुन पार्किंग लाईट लावून या गाडीतील तिघेजण लघुशंखेसाठी गाडीतून खाली उतरले. त्यावेळेस मुंबई बाजूकडून गोव्याच्या दिशेकडे कॉईल घेऊन जाणारा ट्रेलर क्र. एमएच 46 एफ 5605 या भरधाव ट्रेलर चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्यामुळे ट्रेलर सरळ जाऊन तिघांना धडक देत समोर उभ्या असलेल्या इरटीगा गाडीला पाठीमागून धडक दिली. या भीषण अपघातात अमित विनोद कवळे (22) रा. ठाणे हा जागीच ठार झाला. तर, टेरेस करवाले व रोहन जाधव या दोघांना पुढील उपचारासाठी माणगाव उपजिल्हा रुग्णालयात नेत असता येथील डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर टेरेस करवाले (22) रा. ठाणे हा मृत झाल्याचे सांगितले. तर, रोहन जाधव याचा पाय फ्रॅक्चर होऊन गंभीर जखमी झाला आहे.
दरम्यान, या अपघाताची खबर मिळताच महामार्ग पोलीस केंद्र वाकणचे पोलीस उपनिरीक्षक परशुराम भोईर व नागोठणे पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक चव्हाण व त्यांचे सर्व सहकारी घटनास्थळी तात्काळ दाखल होऊन मृत झालेल्या इसमास शवविच्छेदनासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र नागोठणे येथे, तर जखमींना माणगाव येथे पाठवण्यात आले. या अपघाताचा पुढील तपास नागोठणे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक तानाजी नारनवार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.

Exit mobile version