टीईटी घोटाळाः कोकणातील 52 शिक्षकांचा पगार गोठवला

मुंबई, ठाणे, पालघर, रायगडमधील नामांकित शाळांमध्ये कार्यरत

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।

टीईटी गैरप्रकारात अपात्र ठरलेल्या राज्यातील शिक्षकांचे पगार ऑगस्टपासून बंद करण्यात आले आहेत. यामध्ये 7,874 उमेदवारांपैकी प्राथमिक शाळेच्या 576 आणि माध्यमिक शाळेच्या 447 शिक्षकांना अपात्र ठरवण्यात आले आहे. त्यामध्ये कोकण विभागातील माध्यमिक आणि प्राथमिक विभागातील तब्बल 52 शिक्षकांचा समावेश असून त्यांचे पगार गोठवण्यात आले आहेत.

मुंबई विभागात माध्यमिकचे 16 तर प्राथमिकचा एकही शिक्षक नाही. पालघर जिल्ह्यातील 6 माध्यमिक आणि एक प्राथमिक शिक्षक, रायगड जिल्ह्यातील तीन माध्यमिक आणि दोन प्राथमिक, तर ठाणे जिल्ह्यातील 14 माध्यमिक आणि 20 प्राथमिक शिक्षकांचा समावेश आहे. या सर्व शिक्षकांचा पगार गोठवण्यात आला आहे. याबाबतच्या कारवाईचे पत्र माध्यामिक आणि प्राथमिक विभागाच्या शिक्षण संचालकांनी संबंधित शिक्षणाधिकार्‍यांना दिले आहेत. त्यानुसार बुधवारपासून कारवाईला सुरुवात झाली आहे.

अपात्र ठरलेल्या शिक्षकांचा ऑगस्टपासून वेतन बंद करण्याचा निर्णय शिक्षण संचालक कार्यालयाकडून घेण्यात आला आहे. याशिवाय त्यांचे शालार्थ आयडी गोठवण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. या निर्णयामुळ या शिक्षकांना पुढील सप्टेंबर महिन्यात मिळणारे पगार अदा केला जाणार नाही. अपात्र यादीतील शिक्षक हे महानगरपालिका, नगरपालिका, नगरपरिषद, खासगी, अनुदानित, अंशतः अनुदानित शाळांमध्ये शिक्षक सेवक किंवा सहशिक्षक पदावर कार्यरत असल्याचे आढळून आले आहे. शिक्षक अपात्र ठरल्यानंतरही ते शालार्थ प्रणालीद्वारे वेतन अनुदान घेत होते. त्यामुळे त्यांचे ऑगस्टपासून वेतन वगळण्यात यावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

रायगड जिल्ह्यातील दोन शिक्षक बोगस
रायगड जिल्ह्यातील पाच सहाय्यक शिक्षकांचा पगार थांबवण्याचे आदेश शिक्षण संचालकांनी दिले आहेत. त्यामध्ये माध्यामिकच्या तीन शिक्षकांचा समावेश आहे. एक शाळा अलिबाग तालुक्यातील अन्य दोन शाळा या पेण तालुक्यातील असून या ठिकाणी ते कार्यरत होते. तर प्राथमिक विभातील दोन शिक्षक हे बोगस असल्याचे समोर आले आहे. पनवेल येथील कळंबोली आणि दुसरे पेण-गडब येथील शाळेत कार्यरत होते.

गैरव्यवहाराची व्याप्ती मोठी
टीईटी परीक्षा उत्तीर्ण करून देण्यासाठी 7 हजार 880 उमेदवारांकडून प्रत्येकी दीड ते दोन लाख रुपये घेण्यात आल्याची शक्यता आहे. त्यामुळे या गैरव्यवहाराची व्याप्ती मोठी असू शकते. 2019 साली झालेल्या टीईटी अर्थात शिक्षक पात्रता परीक्षेत तब्बल 7 हजार 800 विद्यार्थी बोगस पद्धतीने पात्र ठरल्याचे पुणे सायबर पोलिसांच्या तपासात उघड झाले होते. महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेकडून बोगस शिक्षकांच्या नावांची यादी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील शिक्षण अधिकार्‍यांकडे पाठवण्यात येणार आहे.

शिक्षण संचालकांकडून दोन शिक्षकांचे वेतन थांबवण्याचे आदेश दिलेले आहेत. त्याबाबत त्यांचे पत्र प्राप्त झाले आहे. त्यानुसार कार्यवाही करण्यात येईल.

पुनिता गुरव, शिक्षणाधिकारी, प्राथमिक विभाग

शिक्षण विभागाकडून संबंधित शिक्षकांची शालार्थ आयडी गोठवण्याची कारवाई करण्यात येत आहे. त्यानुसार त्यांचे पगार आता होणार नाहीत.

ज्योत्स्ना शिंदे, शिक्षणाधिकारी, माध्यामिक
Exit mobile version