रायगडच्या समुद्रकिनारी जेलिफिशचे थैमान

मासेमारी अडकली समस्यांच्या जाळ्यात
मत्स्यव्यावसायिकांवर उपासमारीचे संकट

। धम्मशील सावंत । पाली/बेणसे ।
रायगड जिल्ह्यातील अलिबाग, मुरुड, श्रीवर्धन व कोकण किनारपट्टीत समुद्रकिनारी जेलिफिशचे थैमान सुरू झाले आहे. येथील कोळीबांधवांना मासेमारीत घातक जेलिफिशची वाढ झाल्याने मासळी मिळणे मुश्किल झाले असून, मासेमारी समस्यांच्या जाळ्यात अडकली आहे. उत्पादन घटल्याने मच्छिमार संकटात सापडला आहेत.

रायगड जिल्ह्यातील समुद्रकिनारी दिघी, आदगाव, दिवेआगर, भरडखोल, जीवना, बागमांडला व मुरुड तसेच अलिबाग तालुक्यातदेखील नवेदर नवगाव, रेवस, बोडणी, मांडवा, वरसोली अशी मासेमारीसाठी अनेक प्रसिद्ध बंदरे आहेत. मात्र, याठिकाणी जेलिफिशमुळे उत्पादनावर विपरीत परिणाम झाल्याने कोळीबांधव व मत्स्यव्यावसायिक चिंताग्रस्त झालेत. कोकणातील पर्यटनासाठी नारळ-सुपारीच्या बागा, निसर्ग सौंदर्याने नटलेली गावे यासोबतच रोजगार मिळवून देणारी पारंपरिक मासेमारी महत्त्वाची ठरते. मात्र, मोठ्या प्रमाणात समुद्रात जेलिफिशचे संकट वाढल्याने मासेमारी समस्यांच्या जाळ्यात अडकली आहे.

अवकाळी पाऊस व बदलणारे हवामान यामुळे मोठ्या प्रमाणात मासळी मिळणे फार मुश्किल झाले आहे. आठ ते दहा दिवस खोल समुद्रात जाऊनसुद्धा पुरेशी मासळी मिळत नसल्याने व्यावसायिक चिंतेत आहेत. डिझेल खर्च, बर्फ व होडीवर काम करणार्‍या लोकांची मजुरीसुद्धा सुटत नाही. त्यामुळे हा व्यवसाय कसा करावा, हा मोठा प्रश्‍न निर्माण झाला आहे. त्यातच सध्या खोल समुद्रात जेलिफिश वाढल्याने जाळ्यात त्याचेच प्रमाण जास्त असल्याने मासळी फार कमी मिळत आहे. खर्चदेखील सुटत नसल्याची परिस्थिती आहे. अवकाळी पाऊस व वादळामुळे मच्छिमारांनी होड्या समुद्रकिनारी नांगरल्या आहेत.

मासेमारीत डोलवीमध्ये मोठया प्रमाणात जेलिफिश अडकल्याने ती शरीराला घातक ठरत असून, हातापायांना, डोळ्यांना इजा होण्याची भीती मासेमारीला निघताना मनात कायम आहे.

– बाळकृष्ण रघुवीर, माजी चेअरमन, जीवना कोळीवाडा

पाच वर्षांपासून जेलीफिशमुळे आमचे मासळी उत्पादन घटलेय. एलईडी बोटीमुळे जेलीफिश वाढले. प्रकाशझोताने जेलीफिश खोल समुद्रात जात नसून, किनार्‍याकडे येते. जाळ्यात जेलीफिश मोठ्या प्रमाणावर सापडत असून, मत्स्य उत्पादनाला फटका बसला आहे. सरकारकडून कोणतीही नुकसान भरपाई मिळत नाही. आम्हाला नुकसान भरपाई मिळावी.

– दिनेश सुरेकर, नवेदर नवगाव

जेलीफिशच्या उपद्रवाने मत्स्य उत्पादन घटते आहे. सागरात येणारी वादळ, वातावरणातील बदल, अन्नसाखळीमधील बदल झाल्यानंतर जेलिफिशला खाद्यपदार्थाची विपुलता किनारपट्टीवर अधिक आढळण्याची शक्यता असते. सागरातील जीवाणू हे खाद्यासाठी एकमेकांवर अवलंबून असतात. त्यामुळे एखाद्या जिवाणुची संख्या कमी अथवा जास्त होताना दिसते. सध्या जेलिफिशचे प्रमाण वाढल्याचे दिसते आहे.

– सुरेश भारती, सहाय्यक मत्स्य आयुक्त, अलिबाग-रायगड

कसे तयार होतात जेलिफीश?
समुद्रात मोठ्या प्रमाणात मानवी आणि औद्योगिक मैला फेकण्यात येतो. त्यामुळे समुद्रातील प्राणवायू ह्या रसायनांची संयुगे बनवत असल्याने कमी होतो आहे. शिवाय या रसायनांमुळे, समुद्रात अतिरिक्त प्रमाणात नत्र आणि इतर पोषक द्रव्यांच्या मानवी मैलातून झालेल्या अतिरिक्त प्रदूषणामुळे लाल शैवालसारखे घातक शैवाल वाढीस लागतात. ज्यामुळे समुद्रात खोलवर सूर्यकिरणे पोहोचत नाहीत. ज्यामुळे विविध खोलीवर वाढत असलेल्या पाणवनस्पती आणि इतर चांगले शैवाल मरुन जातात आणि येथे प्राणवायू आणि अन्न पदार्थांची कमी झाल्याने इतर प्राणीदेखील मृत पावतात. पाण्यात कमी झालेला प्राणवायू आणि प्रमाणाबाहेर वाढलेलं शैवाल जेलीफिशसारख्या प्राण्यांना वाढण्यासाठी अत्युत्तम वातावरण बनवतात. कारण ह्या प्राण्यांना जगण्यासाठी जास्त प्राणवायू लागत नाही. आणि, पाण्यातील प्राणवायू कमी झाल्याने ह्यांना खाणार्‍या माशांचीदेखील संख्या कमी झालेली असते आणि अशाप्रकारे जेव्हा इतर प्राण्यांची संख्या जवळपास नगण्य होते, तेव्हा जेलीफिशची संख्या प्रमाणाबाहेर वाढते.

Exit mobile version