थलापतीने घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ

| चेन्नई | वृत्तसंस्था |

तामिळनाडूमध्ये चार दिवस चाललेल्या राजकीय उलथापालथी आणि सस्पेन्सनंतर अखेर ‌‘थलापती’ सी. जोसेफ विजय यांनी रविवारी (दि.10) मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. मुख्यमंत्री झाल्यानंतर विजय म्हणाले की, माझ्या व्यतिरिक्त दुसरा कोणताही पॉवर सेंटर नसेल. सत्तेचा एकमेव केंद्रबिंदू मीच राहीन. त्यांच्या या विधानाचा आघाडीचे मित्रपक्ष आणि राजकीय विरोधक या दोघांसाठीही मोठा संदेश मानला जात आहे. विजय यांनी आपल्या भाषणात स्वतःला ‌‘थम्बी’ म्हणजेच धाकटा भाऊ म्हणत असे सांगितले की, त्यांच्या सरकारवर कोणत्याही मित्रपक्षाचा दबाव चालणार नाही. त्यांनी विरोधकांनाही इशारा देण्याच्या स्वरात संदेश दिला. तसेच, मुख्यमंत्री विजय यांनी सरकार स्थापनेसाठी पाठिंबा देणाऱ्या सर्व पक्षांचे व्यासपीठावरून आभार मानले. त्यांनी काँग्रेस खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा उल्लेख आपला भाऊ असा केला. विजय म्हणाले की, ते काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, माझे भाऊ राहुल गांधी, के.सी. वेणुगोपाल, सेल्वापेरुंथगई आणि प्रवीण चक्रवर्ती यांचे ऋणी आहेत. याशिवाय त्यांनी माकप नेते पी. शणमुगम आणि सु. व्यंकटेशन, व्हीसीके नेते थोल थिरुमावलवन, रविकुमार आणि वन्नियारासू, तसेच सीपीआय नेते एम. वीरापांडियन यांचेही आभार मानले. त्यांनी टीव्हीके कार्यकर्ते आणि व्हर्च्युअल वॉरियर्सचेही विशेष आभार मानले. यावेळी मुख्यमंत्री विजय यांच्यासोबत टीव्हीकेच्या इतर नऊ नेत्यांनीही मंत्रीपदाची शपथ घेतली. त्यामध्ये एआयएडीएमकेचे ज्येष्ठ नेते के.ए. सेंगोट्टैयन हे सर्वात चर्चेत असलेले चेहरे ठरले. याशिवाय विजय यांचे जवळचे रणनीतीकार मानले जाणारे आधव अर्जुन, टीव्ही आणि चित्रपट क्षेत्राशी संबंधित आणि आपल्या प्रभावी वक्तृत्व शैलीसाठी प्रसिद्ध असलेले राज मोहन, दंतवैद्य ते राजकारणी बनलेले डॉ. टी.के. प्रभू आणि मंत्रिमंडळातील सर्वात तरुण मंत्री एस. कीर्तना यांनीही शपथ घेतली. काँग्रेस, सीपीआय(एम), व्हीसीके आणि आययूएमएलच्या ज्या नेत्यांनी टीव्हीके सरकारला पाठिंबा दिला आहे, ते खात्यांच्या वाटपावर चर्चा पूर्ण झाल्यानंतर नंतर मंत्रीपदाची शपथ घेऊ शकतात.

Exit mobile version