महामार्ग अधिकार्यांचा कानाडोळा
| पेण | प्रतिनिधी |
मे. हावरे ग्रँड कंपनीने सरकारी जागेत अतिक्रमण करीत केलेले बांधकाम कृषीवलने आवाज उठवून महसूल विभागाच्या निदर्शनास आणून दिले. त्यानंतर संबंधित प्रशासनाने कारवाईचा बडगा उचलताच अंगलट आलेले अतिक्रमण रातोरात काढण्यात आले. मात्र, पंचनाम्यात मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाची साधारणतः 15 मीटर जागा आतमध्ये घेतल्याचे नमूद असताना, ही जागा हावरे ग्रुपने आपल्या कुंपणामध्ये पत्रे लावून आत घेतली आहे. याकडे राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी कानाडोळा का करत आहेत. याबाबत सध्या जनसामान्यात उलटसुलट चर्चा सुरू आहेत.
मे. हावरे ग्रँड म्हटल्यानंतर एक गृहनिर्माण व्यवसायातील नाव, मात्र नाम बडे और दर्शन छोटे. पेण नगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात मे. हावरे ग्रँड यांच्यातर्फे अनिल कुमार सिंघ व उज्ज्वला सतीश हावरे यांच्या नावे सर्वे नं. 256अ/1, 256अ/2 हे सातबारे आहेत. त्याच्याच शेजारी असलेल्या 256अ/3 हा महाराष्ट्र शासनातर्फे महाराष्ट्र गृहनिर्माण मंडळ क्षेत्र विकास या नावाने म्हाडाचा सातबारा आहे. हावरे गु्रपने स्वतःची जागा सोडून महाराष्ट्र गृहनिर्माण मंडळ क्षेत्राच्या जागेवर बांधकाम केले होते. मात्र, शेजारी असणारे जागरूक शेतकरी अमित पाटील यांनी कृषीवलच्या मदतीने हावरे ग्रुपने केलेली घुसखोरी सर्वांच्या समोर आणली आणि कायदेशीर कारवाईची मागणी तहसीलदार, प्रांताधिकारी, जिल्हाधिकारी व मुख्यमंत्र्यांकडे केली होती.
याबाबत पेण तहसील कार्यालयाने तात्काळ दखल घेत 5 फेब्रुवारी रोजी मंडळ अधिकारी सुजाता जाधव व पेण तलाठी अनिकेत पाटील यांना घटनास्थळी पाठवले. त्यावेळी आमचे प्रतिनिधी घटनास्थळी स्थळ पंचनामा करण्यासाठी हजर होते. प्रथमदर्शनीच मंडळ अधिकारी आणि तलाठ्यांनी अतिक्रमण झाल्याचे सांगून पंचनामा केला. त्यानंतर हावरे ग्रुपला समजून चुकले की, 256 अ/3 या सातबार्यावरील बांधकाम आपल्या अंगलट येईल. हे पाहून त्यांनी ते बांधकाम रातोरात काढले. परंतु, मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाची साधारणतः 15 मीटर जागा आतमध्ये घेतल्याचे मंडळ अधिकारी सुजाता जाधव व तहसीलदार यांनी आपल्या पंचनाम्यामध्ये नमूद केले होते. मात्र, आता ही मुंबई राष्ट्रीय महामार्गाची 15 मीटरची जागा ही हावरे ग्रुपने आपल्या कुंपणामध्ये पत्रे लावून आत घेतली आहे. सदरील जागा ही राष्ट्रीय महामार्गाची असूनही राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी याकडे कानाडोळा का करत आहेत. याबाबत सध्या जनसामान्यात उलटसुलट चर्चा सुरू आहेत. तरी तातडीने राष्ट्रीय महामार्गाची जागा खाली करावी आणि घातलेले कुंपण काढून टाकावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे.