पेण भाजपचा वाद चव्हाट्यावर
| पेण | प्रतिनिधी |
मुख्य जिल्हा रस्ता 23 ते भाल विठ्ठलवाडी हा 4.5 किलोमीटरचा रस्ता मुख्यमंत्री सडक योजना टप्पा क्रमांक 2 मधून मंजूर झाला असून, त्याचा रविवारी भूमीपूजन सोहळा पार पडला. दरम्यान, पेण भाजप खारेपाट विभागाचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर आलेला पहायला मिळाला. कारण, ज्यांनी निधी दिला, त्यांचाच फोटो बॅनरवरून गायब होता.
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री महाड येथील न्यायालयाच्या कार्यक्रमासाठी रायगडमध्ये उपस्थित होते; परंतु, पेण खारेपाटातील कार्यकर्त्यांनी भूमीपूजनाच्या बॅनवरवर मुख्यमंत्र्यांचा फोटो न लावून जणू काही त्यांना घरचाच आहेर दिल्याचे पहायला मिळाले. गेली दोन ते तीन महिने खारेपाटात गटा-तटाच्या राजकारणाला ऊत आल्याचे पहायला मिळत आहे. गेल्याच महिन्यात झालेल्या जिल्हा चाचणीच्या वेळी वैकुंठ पाटील समर्थकांनी हरी ओम समर्थकांचे बॅनवरवरुन फोटो गायब केल्याचे पहायला मिळाले. तर, आज भाल विठ्ठलवाडी काँक्रिटकरण रस्त्याच्या भूमीपूजनाच्या बॅनवरवरुन वैकुंठ पाटील, सरचिटणीस मिलिंद पाटील, प्रफुल्ल म्हात्रे, भाई म्हात्रे यांचे फोटोदेखील गायब होते. एकंदरीत काय तर, आगामी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या अगोदर भाजपमध्ये गटातटाच्या राजकारणाला चांगलाच वेग आल्याचे पाहायला मिळत आहे. त्यातच भूमीपूजनाच्या बॅनवरवरुन दस्तुरखुद्द मुख्यमंत्र्यांचादेखील फोटो गायब असल्याने पेण भाजप खारेपाट विभागामध्ये नक्की काय चालले आहे, याविषयी उलटसुलट चर्चांना उधाण आलेले आहे.