। अलिबाग । प्रमोद जाधव ।
अलिबागमधील पांढर्या कांद्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात आले आहे. मात्र, मागणी कमी झाल्याने दरात देखील प्रचंड घसरण झाली आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. कांद्याला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.
अलिबाग तालुक्यात पांढर्या कांद्याचे सुमारे 300 हेक्टर क्षेत्र आहे. कार्ले, खंडाळे, वाडगाव या भागातील असंख्य शेतकरी पांढर्या कांद्याची लागवड करतात. अलिबागमधील पांढरा कांदा चविष्ट व औषधी गुणधर्म असल्याने स्थानिकांसह पर्यटकांकडून मागणी मोठ्या प्रमाणात आहे. जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून पांढरा कांदा बाजारात विक्रीसाठी दाखल झाला. स्थानिक बाजारासह पुणे व अन्य जिल्ह्यांमध्ये कांद्याला मागणी आली होती. त्यामुळे सुरुवातीला कांद्याला भावही समाधानकारक मिळाल्याचे शेतकर्यांनी सांगितले. एक मण म्हणजे चार कांद्याच्या माळीमागे एक हजार रुपये मिळत होते. त्यामुळे एक कांद्याची माळ 250 रुपयांना विकली जात होती. परंतु, गेल्या आठ दिवसांपासून कांद्याची मागणी कमी झाली आहे. कांद्याचे उत्पादन अधिक असूनही कांदा बाजारात विकला जात नसल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे सध्या कांद्याचे दर शंभर रुपयांनी कमी झाले आहे. अडीचशे रुपयांना विकली जाणारी कांद्याची माळ सुमारे दीडशे रुपयांना विकण्याची वेळ आली आहे. कांद्याचे भाव कमी झाल्याने शेतकरी मोठा आर्थिक अडचणीत सापडला आहे. कांद्याला चांगला भाव मिळावा यासाठी शासनाने प्रयत्न करावे, अशी मागणी होत आहे.
जीआय मानांकन मिळूनही कांद्याकडे पाठ
पांढर्या कांद्याला जीआय मानांकन मिळाले आहे. त्यामुळे बाजारात चांगली मागणी वाढेल, अशी शेतकर्यांना अपेक्षा होती. मात्र, कांदा लागवड करण्यासाठी लागणारे खत, फवारणी व इतर औषधांचे प्रमाणपत्राशिवाय कांद्या घेण्यास अन्य संस्था, कंपन्यांकडूनदेखील नकार दिला जात आहे. त्यामुळे तयार झालेला कांदा गोडाऊनमध्ये पडून असल्याचे सांगण्यात आले आहे.
मजुरीचे वाढते दर
कांदा लागवड करण्यापासून कांद्याची माळ तयार करणे. बाजारात विक्रीसाठी पाठविणे, आदी कामांतून स्थानिकांना रोजगार मिळत आहे. मात्र, काही ठिकाणी मजूरकर मिळणे कठीण होऊन बसले आहे. अपुर्या मनुष्यबळामुळे मजुरीचे दरही वाढू लागले आहेत. सुमारे तीनशे ते साडेतीनशे रुपये दिवसाची मजुरी मोजावी लागत असल्याचे सांगण्यात आले आहे.
गेल्या काही दिवसांपासून कांद्याचे भाव घसरले आहेत. कांद्याचे उत्पादन असूनदेखील मागणी नसल्याची चिंता निर्माण झाली आहे. एक मण म्हणजेच चार कांद्याच्या माळी एक हजार रुपयांना विकली जात होती. आता पाचशे ते सहाशे रुपयांपर्यंत विकावी लागत आहे. त्यामुळे शेतकर्यांना सुमारे चारशे रुपयांनी तोटा सहन करावा लागत आहे.
सतीश म्हात्रे,
कांदा उत्पादक शेतकरी