कणगुलेतील घरफोडीमधील मुद्देमाल आरोपीसह हस्तगत

| पोलादपूर | प्रतिनिधी |

तालुका पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या घरफोडीच्या गुन्ह्यातील मुद्देमाल आरोपीसह हस्तगत करण्यात पोलादपूर पोलिसांचे वेगवान तपासकार्य कारणीभूत ठरल्याने तब्बल 1 लाख 35 हजारांचा मुद्देमाल आता तक्रारदार महिलेला मिळण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

पोलादपूर तालुक्यातील कणगुले गावाच्या हद्दीत दि.19 ते दि. 27 ऑगस्ट 2026 दरम्यान, पोलादपूर पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. यातील फिर्यादी अपर्णा अल्पेश तुर्डे यांनी फिर्याद दिल्याने सहायक पोलिस निरीक्षक विजय सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने तपास सुरू केला. यातील महाड तालुक्यातील धामणे येथील आरोपी राकेश नथुराम भालेकर (39) याने हा गुन्हा केल्याचे तपासाअंती निष्पन्न झाल्याने पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन तपास केला. यावेळी गुन्ह्यात चोरीला गेलेली सोन्याची चैन तसेच रोख रक्कम असा एकूण 1 लाख 35 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी शिताफीने हस्तगत केला आहे.

यात सहायक पोलीस निरीक्षक विजय सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मुंडे, सहायक फौजदार कृष्णा जागडे, पोलीस हवालदार स्वप्निल विजय कदम तसेच पोलीस शिपाई अमोल झेपले, सौरव जाधव, तुषार दहिफळे आदी तपास पथकाने तातडीने तपासाची चक्रे फिरवून घरफोडी सारखा गंभीर गुन्हा उघड केल्याने पोलादपूर पोलिसांप्रती नागरिकांमध्ये विश्वासार्हता वाढवली आहे.

Exit mobile version