। उरण । वार्ताहर ।
उरणमध्ये काही महिन्यापूर्वीच रेल्वे स्थानकाबाहेर झालेले ‘हिट अँड रन’ प्रकरण ताजे असताना पुन्हा एकदा असाच काही प्रकार उरण-द्रोणगिरी नोड येथे घडल्याचे समोर आले आहे. द्रोणगिरी येथील देवकृपा चौक येथे एका भरधाव होंडा सिटी गाडीने 4 ते 5 जणांना उडवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या अपघातात तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघात हा एवढा भयानक होता की रस्त्यावर उभे असलेले नागरिक थोडक्यात बचावले आहेत. मात्र, याबाबत अनेक दिवस उलटूनही अद्याप गुन्हा दाखल झाला नसल्याने आश्चर्य व्यक्त करीत जनतेत अनेक तर्कवितर्क काढले जात आहेत. मात्र, हा गुन्हा सर्वसामान्य जनतेच्या हातून घडला असता तर त्यावर त्वरित कारवाई झाली असती, अशी चर्चा ही सुरू आहे.
शनिवार दिनांक 24 ऑगस्ट रोजी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास ही भयंकर घटना घडली आहे. या अपघाताचं धडकी भरवणारे सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे. या अपघातात एक व्यक्ती गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. अपघातानंतर ही गाडी एका सोसायटीच्या पार्किंगमध्ये पार्क करून कव्हर टाकून ठेवली असल्याचे आढळून आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास उरण पोलिस करीत असून अद्याप कोणावरही गुन्हा दाखल नसून अपघातग्रस्त वाहनही ताब्यात घेतले नसल्याचे समजते.