| रायगड | प्रतिनिधी |
उरण तालुक्यातील डाउरनगर येथील तेरा वर्षीय अल्पवयीन पिडीतेस शाळेत जात असताना घरात बोलवून जीवे ठार मारण्याची धमकी देवून अतिप्रसंग करणारा आरोपी रमेश कालेल याला पनवेल येथील सत्र न्यायालयाने दोषी धरून जन्मठेप व 50 हजार रूपये दंड अशी शिक्षा ठोठावली आहे.
आरोपी रमेश कालेल याने 29 ऑक्टोबर 2018 रोजी अल्पवयीन पिडीता शाळेत जात असताना तिला आवाज देवून त्याच्या घरात बोलावून घेतले. दरवाजा आतून बंद करून पिडीतेला जिवे ठार मारण्याची धमकी देवून तिच्यावर अतिप्रसंग करून पहाटेपर्यंत घरात डांबून ठेवले. अल्पवयीन पिडीतेने ओरडण्याचा प्रयत्न केला असता तिचे तोंड दाबून ठेवले. अल्पवयीन पिडीतेला दुसऱ्या दिवशी पहाटे आरोपीने घरामधुन सोडले व झालेला प्रकार घरी सांगितल्यास जिवे ठार मारण्याची धमकी दिली. पिडीता पहाटे घरी आल्यानंतर तिने आईला सदर प्रकाराबाबत सांगितले. त्यानंतर पीडितेच्या आईने अल्पवयीन पीडितेवर बलात्कार केल्याप्रकरणी आरोपी उरण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. पोलिसांनी गुन्हयाचा तपास पूर्ण करून दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले.
या खटल्याची सुनावणी सहा. अति सत्र न्यायाधीश शाइदा शेख यांच्या न्यायालयात झाली. या प्रकरणामध्ये सरकारी पक्षातर्फे विशेष सरकारी अभियोक्ता, ॲड. प्रतिक्षा वडे वारंगे यांनी एकुण 11 साक्षीदारांची साक्ष नोंदविली. यामध्ये पिडीत- मुलीची आई, पिडीत मुलगी तसेच वैद्यकीय अधिकारी आणि तपासिक अंमलदार यांची साक्ष महत्वाची ठरली. सरकारी पक्षातर्फे विशेष सरकारी अभियोक्ता, ॲड. प्रतिक्षा वडे वारंगे यांनी न्यायालयासमोर केलेला युक्तिवाद आणि दाखल केलेले न्यायनिर्णय ग्राह्य धरून सहा अति सत्र न्यायाधीश शाइदा शेख यांनी आरोपी रमेश कालेल यास दोषी धरून जन्मठेप व 50 हजार रूपये दंड अशी शिक्षा ठोठावली आहे.