जिल्हाधिकाऱ्यांनी केली सुविधा केंद्रांची पाहणी
। रायगड । प्रतिनिधी ।
7 सप्टेंबरपासून गणेशोत्सवाला सुरुवात होत आहे. कोकणात येणार्या गणेशभक्तांचा प्रवास अधिक सुखकर आणि सोपा व्हावा, यासाठी त्यांना आवश्यक सर्व सुविधा महामार्गावर सहज उपलब्ध व्हाव्यात, यासाठी रायगड जिल्हा प्रशासनाने मोठी तयारी केली आहे. जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी मुंबई-गोवा महामार्गची प्रत्यक्ष पाहणी करून उभारण्यात आलेल्या सुविधा केंद्रात देण्यात आलेल्या सुविधाचा आढावा घेतला.
मुंबई, ठाणे, पालघर, नवी मुंबई आदी ठिकाणाहून गणेशोत्सवाकरीता गणेशभक्त कोकणात आपल्या गावी मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरुन प्रवास करतात. जिल्हा पोलीस दलाकडून महामार्गावरती पोलीस अधिकारी व कर्मचारी अशा स्वरूपाचा बंदोबस्त तैनात केला जाणार आहे. गणेश भक्तांच्या प्रवासात कोठेही अडचण न येता प्रवास सुखकर होण्याच्या दृष्टिकोनातून सार्वजनिक बांधकाम विभागाने सुविधा केंद्र उभारण्याची कार्यवाही करावी, अशा सूचना सार्वजनिक बांधकाम विभागाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या होत्या. त्यानुसार रायगड जिल्ह्यात 10 ठिकाणी ही सुविधा केंद्र उभारण्यात येत आहेत.
खारपाडा, खारपाले, वाकण, कोलाड, इंदापूर, माणगाव, लोणारे, महाड शहर, महाड टोलफाटा, पोलादपूर येथे ही सुविधा केंद्र असणार आहेत. तसेच या सुविधा केंद्रावर पोलीस मदत केंद्र, आपत्कालीन पोलीस मदत टोईंग व्हॅन, क्रेन, वाहन दुरुस्ती कक्ष, आपत्कालीन वाहन दुरुस्ती व टायरमध्ये हवा भरण्याची सुविधा असणार आहे. वैद्यकीय कक्ष, अॅम्ब्युलन्स सेवा, मोफत आपत्कालीन वैद्यकीय उपचार सुविधा, बालक आहार कक्ष व मोफत चहा, बिस्कीट, सरबत, पाणी, ओआरएस आणि महिलांसाठी फिडींग कक्ष उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. प्रत्येक सुविधा केंद्रावर पोलीस समन्वयकाची नियुक्ती करण्यात आली आहे. गर्दी नियंत्रण, वाहतूक व्यवस्थापन आणि सामान्य जनतेच्या सुरक्षेसाठी पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे विशेष पथक तैनात करण्यात येणार आहे.
यावेळी कार्यकारी अभियंता जगदीश सुखदेवे, उपअभियंता डी. एम पाटील, शाखा अभियंता अनिल भारसाट यांसह विविध कार्यान्वयीन यंत्रणाचे प्रतिनिधी उपस्थित होते. दरम्यान, महामार्गावर मोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे गणेशभक्तांचा प्रवास खडतर होणार आहे.