। रत्नागिरी । प्रतिनिधी ।
लांजा तालुक्यात मराठी शाळांमधली घटती पटसंख्या चिंताजनक असल्याची ओरड सुरू आहे. यासह लांजा तालुक्याचा शैक्षणिक कारभार गेली अनेक महिने प्रभारी अधिकार्यांच्या माध्यमातून सुरु आहे. तसेच, शैक्षणिक दर्जा अधिक सुदृढ बनवायचा असेल तर अनेक दिवस रिक्त असलेले गटविकास अधिकारीपद त्वरित भरणे गरजेचे आहे. शैक्षणिक कारभार प्रभारी सोपवला तर शैक्षणिक प्रगती कशी साधता येईल, असा प्रश्न सर्वसामान्य पालक आणि नागरिक व्यक्त करत आहेत.
शासनाने सुगम आणि दुर्गम निकष लावून जिल्हा परिषदेच्या मराठी शाळांमधील शिक्षकांच्या बदल्या चुटकीसरशी केल्या आहेत. मात्र, रिक्त आणि प्रभारी असणार्या शिक्षण क्षेत्रातील अधिकारी व कर्मचार्यांवर अतिरिक्त कामांचे ओझे तसेच ठेवले आहे. शिक्षण क्षेत्रातील अनेक पदे आज रिक्त असल्याने त्याची जबाबदारी प्रभारी म्हणून कार्यरत असणार्या कर्मचार्यांवर सोपवून प्रशासनाने हात झटकण्याचे काम केले आहे. लांजा तालुक्यामध्ये एकूण 217 जिल्हा परिषदेच्या मराठी शाळा आहेत. शाळांची संख्या जास्त असताना काही ठिकाणी आवश्यक असणारे मुख्याध्यापक पदच नाही. यासह तालुक्यांमध्ये केंद्रप्रमुखांची एकूण 21 पदे आवश्यक असताना त्यातील 11 पदे कार्यरत आहेत.
शिक्षण विस्तार अधिकारी म्हणून चार पदे आवश्यक असताना तीन कार्यरत असून, दोघांपैकी एकाकडे रत्नागिरी शिक्षण विभागाचा अतिरिक्त भार देण्यात आला आहे. तर, एकाकडे लांजा विभागाचा कार्यभार सोपवण्यात आला आहे. यामुळे दोन तालुक्यांच्या जबाबदारीत एक अधिकारी अडकला आहे. लांजा तालुक्याचे मुख्य गटशिक्षण अधिकारी पद गेली अनेक महिने प्रभारी कार्यभारात अडकले असून ही रिक्त पदे तातडीने भरण्याची मागणी होत आहे.
तालुक्यात पाचच केंद्रप्रमुख
217 शाळांसाठी एकूण 21 केंद्रप्रमुखांची गरज असताना फक्त पाच केंद्रप्रमुख कार्यरत आहेत. यातील काही केंद्रप्रमुख पुढील काही महिन्यांनी निवृत्त होणार आहेत. यामुळे आवश्यक केंद्रप्रमुखच नसतील तर शाळांचा शैक्षणिक दर्जा चिंताजनक असल्याचे मत व्यक्त होत आहे.