शेकाप नेते माजी आ. पंडीत पाटील यांनी दिला इशारा
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
जिल्ह्याचे ठिकाण असलेल्या अलिबागकडे जाणारा अलिबाग वडखळ रस्त्याची आज दुरावस्था असून जिल्हा प्रशासन त्याबाबत कसलीच कृती करीत नसल्याने त्वरीत या रस्त्याची दुुरुस्ती करण्यात आली नाही तर शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येईल असा इशारा शेकाप नेते माजी आमदार पंडीत पाटील यांनी दिला आहे.
याबाबत पंडीत पाटील यांनी म्हटले आहे की, अलिबाग वडखळ रस्ता एनएचआयकडे हस्तांतरीत करण्यात आला असून पोयनाड ते तीनविरा रस्त्यावर अनेक खड्डे पडले आहेत. संबंधीत यंत्रणेकडे वारंवार लक्ष वेधूनसुद्धा त्याची दुरुस्ती केली जात नाही. मैनुशेठचा वाडा येथील एका साकवाचा कठडा तुटला आहे. बर्याचशा मोर्या क्षतीग्रस्त झाल्या आहेत. तीनविरा येथील तसेच पळी येथील पुल देखील जीर्ण झाले आहेत. हा रस्ता अंधातरी आहे. विरार कॉरीडॉरमध्ये होईल तेव्हा होईल पण पावसाळ्यापूर्वी दुरुस्ती करुन खड्डे भरले नाहीत तर अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पळजवळ, पेझारी नाक्यावर खड्डे पडले आहेत. संबंधीत यंत्रणेला कल्पना देऊन देखील अधिकारी दुर्लक्ष करत आहेत. या रस्ता आहे कोणाकडे असा सवालही पंडीत पाटील यांनी केला आहे.
पोयनाड नागोठणे रस्त्याप्रमाणे या रस्त्याचे देखील नुतनीकरण होण्याची आवश्यकता आहे. बरीच अवजड वाहतूक आहे. या रस्त्यावरील अनेक मोर्या बंद पडल्या आहेत. पोयनाड नाक्यावरील गटार तुंबलेले आहे. पावसाळयामध्ये पाणी थांबते. संबंधीत यंत्रणेला वारंवार मागणी करुन देखील काहीच करायला तयार नाहीत. या रस्त्याचा मालक नक्की आहे कोण? याचाही जाब विचारला आहे.
महाराष्ट्रात रायगड हा एकमेव जिल्हा आहे की ज्याला जोडणारा एकही चारपदरी रस्ता नाही. रायगड मध्ये फार मोठया प्रमाणात औद्योगिकरण आहे. फार मोठया प्रमाणावर महसूल या जिल्ह्यातून केंद्र आणि राज्याला दिला जातो. महाराष्ट्रातील 35 जिल्ह्यात एकमवे अपवाद रायगड जिल्ह्याचा आहे. संंबंधीत यंत्रणा सांगते की अलिबाग विरार कॉरीडॉर मध्ये हा रस्ता होईल असे सांगितले जाते. हा कॉरीडॉर होईल तेंव्हा पण आज वाहतूकीचा प्रचंड त्रास सहन करावा लागतो त्यातूर कधी मुक्तता होईल. पनवेलवरुन वडखळला यायला 20 ते 25 मीनीटं लागतात पण वडखळवरुन अलिबागला जायला दोन दोन तास जातात. हा जनतेचा त्रास कधी कमी होणार आहे. आज पैशाची गोष्ट झाली तर पुणे औरंगाबाद रस्त्याला 10 हजार कोटी रुपये दिले. मग रायगड जिल्ह्यातील रस्त्याच्या समस्या कधी सुटणार आहेत. अनेक निवेदने देऊन देखील जिल्हा प्रशासन याबाबत कसलीच खबरदारी घेत नाही. वेळप्रसंगी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येईल असा इशारा पंडित पाटील यांनी दिला आहे.