जिल्हा रुग्णालयात हजारो गोरगरिब उपचार घेण्यासाठी येतात. सध्या कोरोनामुळे जिल्हा रुग्णालयात रुग्णांची संख्या एरव्ही पेक्षा जास्त असते. जिल्हा रुग्णालयांना अनेक समस्यांनी ग्रासलेले असते. अशातच बीड जिल्हा रुग्णालयात एका माथेफिरुने धिंगाणा घातल्याने रुग्णालयातील नियोजन पुरते बिघडले. त्या माथेफिरुने रुग्णालय परिसरात पार्क करण्यात आलेल्या तीन रुग्णवाहिकेच्या समोरच्या काचेवर दगड फेकून, रुग्णवाहिकांचे नुकसान केले. हा माथेफिरू केवळ यावरच थांबला नाही, तर त्याने थेट अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक सुखदेव राठोड यांच्या दालनात जाऊन धिंगाणा घातला. दालनामधील वस्तू या व्यक्तीने खाली जमीनीवर फेकून त्याचे नुकसान केले. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात माथेफिरू विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेने रुग्णालय परिसरात एकच खळबळ उडाली आहे. अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक सुखदेव राठोड यांनी यासंदर्भात सविस्तर माहिती दिली. जिल्हा रुग्णालयामध्ये उभ्या असणार्या तीन रुग्णवाहिकांचे दगड मारुन नुकसान केले आहे. त्याच्याविरोधात बीड शहर पोलीस स्थानकात तक्रार नोंदवली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.