| आगरदांडा | प्रतिनिधी |
मुरूड तालुक्यातील गौरी-गणपतींचा विसर्जन सोहळा मोठ्या उत्साहात आणि मंगलमय वातावरणात पार पडला. यावेळी मुरूडमधील तब्बल 2 हजार 230 गणपती व 650 गौरींचे विसर्जन पारंपरिक पद्धतीने करण्यात आले.
गणेशभक्तांनी आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी ढोल-ताशांच्या गजरात आणि फटाक्यांची आतषबाजी करत भव्य विसर्जन मिरवणुका काढल्या. ‘एक दोन तीन चार, गणपतीचा जयजयकार’, ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’, ‘गणपती गेले गावाला, चैन पडेना आम्हाला’ अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. गेल्या पाच दिवसांपासून गणेशभक्तांना सकारात्मक ऊर्जा व आनंद देणाऱ्या गणरायाला निरोप देताना भक्त भावुक झाले होते. मात्र, त्याचवेळी विसर्जन मिरवणुकीतील उत्साह आणि जल्लोषाला उधाण आले होते. लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत मोठ्या संख्येने नागरिक या मिरवणुकीत सहभागी झाले होते. ढोल-ताशांचा निनाद, फटाक्यांची आतषबाजी आणि गणरायाच्या जयघोषामुळे सर्वत्र भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.
मुरूड पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक परशुराम कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली विसर्जन मिरवणुकीच्या मार्गावर तसेच प्रमुख चौक आणि विसर्जनस्थळी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी वाहतूक पोलीस नाईक किशोर बठारे यांच्यासह पोलीस मकरंद पाटील यांनी विशेष नियोजन केले. या दरम्यान, येणाऱ्या-जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी बाजारपेठ मित्र मंडळाच्या वतीने थंड पेयाची व्यवस्था करण्यात आली होती. त्यामुळे गणेशभक्तांना मोठा दिलासा मिळाला. उसळलेल्या गणेशभक्तांच्या महासागरात, ढोल-ताशांच्या निनादात आणि ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात तालुक्यातील मानाच्या गौरी-गणपतींचा विसर्जन सोहळा उत्साहात व शांततेत पार पडला.







