23 मिमी पावसाची नोंद
| आगरदांडा | प्रतिनिधी |
दीर्घ प्रतीक्षेनंतर मुरूड तालुक्यात रविवारी रात्रीपासून ते सोमवारी सकाळपर्यंत विजांच्या कडकडाटासह पावसाने दमदार हजेरी लावली. अनेक भागांत मध्यम ते जोरदार सरी कोसळल्याने उकाड्यापासून नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
शहर व परिसरात झालेल्या पावसामुळे गेल्या 12 तासांत 23 मिमी पावसाची नोंद झाली आहे, अशी माहिती मुरूड तहसीलदार कार्यालयात संदेश वाळंज यांनी दिली. पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून तापमानातही घट झाली आहे. अनेक भागांत मध्यम ते जोरदार सरी कोसळल्याने रस्त्यांवरील धूळ कमी झाली आणि हवेत ताजेपणा जाणवू लागला.
गेल्या काही दिवसांपासून वाढलेल्या उष्णतेमुळे नागरिक त्रस्त झाले होते. मात्र पावसाच्या आगमनाने उकाड्याची तीव्रता कमी झाली असून नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
यंदा मान्सूनच्या प्रगतीला विलंब झाल्याने जूनच्या बहुतांश काळात तालुक्यात अनेक भाग कोरडे राहिले होते. मात्र आता पावसाची सक्रियता वाढण्याची चिन्हे दिसत असून येत्या काही दिवसांत पावसाचा जोर आणखी वाढू शकतो.
दरम्यान, पावसामुळे काही ठिकाणी वाहतुकीचा वेग मंदावला असला तरी बहुतेक नागरिकांनी या पावसाचे स्वागत केले आहे. शेतकरी वर्गासाठीही हा पाऊस दिलासादायक मानला जात असून खरीप हंगामाच्या तयारीला वेग येण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
