रिलायन्सच्या सुरक्षा अधिकाऱ्याची मुजोरी

| पाली/बेणसे | प्रतिनिधी |

लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारांवरील वाढते हल्ले, दबाव, मुस्कटदाबी सारख्या घटना वाढल्या असताना आता पत्रकारांना आपले कर्तव्ये बजावण्यासाठी देखील रोखण्याचे काम काही महाभाग करीत आहेत. असाच संतापजनक प्रकार गुरुवारी रिलायन्स नागोठणे मटेरियल गेटसमोर घडला.

नागोठणे-पोयनाड मार्गावर रिलायन्स कंपनीतील एका कारने एका व्यक्तीला जोरदार धडक दिली. या अपघातात त्या व्यक्तीच्या पायाला गंभीर दुखापत होऊन ती व्यक्ती रस्त्यावर पडून होती. रुग्णवाहिका येईपर्यंत प्रतीक्षा करीत असताना यावेळी घटनास्थळी उपस्थित असलेले पत्रकार धम्मशील सावंत यांनी वार्तांकन करण्याच्या हेतूने मोबाईलमध्ये व्हिडीओ व फोटो घेण्यास सुरुवात केली. मात्र, त्याच वेळी या ठिकाणी उपस्थित असलेल्या रिलायन्सच्या आरजीएसएसच्या सुरक्षा अधिकाऱ्याने, पत्रकार असलेत तरी व्हिडीओ करू शकत नाही, असे सांगत हातातून मोबाईल खेचून घेतला. त्यांनी वारंवार मोबाईल मागूनही मोबाईल दिला नाही. सुरक्षा अधिकाऱ्याने आपला मुजोर व उर्मठपणा कायम ठेवला. त्यामुळे रिलायन्सच्या सुरक्षा अधिकाऱ्याच्या या कृतीचे व घटनेचा राज्यातील पत्रकार संघटनांसह, पत्रकारांनी निषेध दर्शविला आहे. दरम्यान, रिलायन्स व्यवस्थापन अशा मुजोर सुरक्षा अधिकाऱ्याला समज देणार की पुन्हा पुन्हा अशी मुजोरी करायला बळ देणार हे पाहणे औत्सुक्याचे आहे.

Exit mobile version