नाईक कुटुंबियांनी जपली 35 वर्षांची परंपरा
| कोर्लई | वार्ताहर |
दिवाळीचा सण म्हटला की सर्वत्र मातीचे किल्ले बनविण्याची परंपरा आहे. अगदी बच्चे कंपनीपासून घरातील माणसे किल्ले बनविण्यात मग्न होतात. काहीजण वैयक्तिक करतात तर काही मंडळ करतात. मात्र काही वर्षा नंतर ते हे बंद करतात. मात्र याला अपवाद आहेत मुरुड जंजिरा येथील कुंभारवाड्यातील नाईक कुटुंबीय! हे कुटुंब गेली 35 वर्ष दिवाळी निमित्ताने मातीचे किल्ले बनवीत आहेत. 1987 साली प्रभात दत्तात्रेय नाईक यांनी आपल्या घरी पहिल्या किल्ल्याची प्रतिकृती बनविली ती शेतातील माती, पुठ्ठा, नळीचे कौल, रंग, तार याचे वापर करून. त्यानंतर आजपावेतो प्रत्येक वर्षी यांनी आपल्या घरी अंगणात मातीच्या किल्ल्यांची प्रतिकृती बनविली आहे. त्यांचे दिवाळी निमित्ताने किल्ला बनविण्याचे यंदाचे हे 35 वे वर्ष असून या कालावधीत किल्ल्यांच्या प्रतिकृतीसाठी आतापर्यंत त्यांना 16 वेळा पारितोषिके मिळाली आहेत.
यंदा त्यांनी बीड जिल्हा येथील परळी वैजनाथ जवळील धर्मापूरी येथील किल्ले धर्मापुरी याची प्रतिकृती तयार केली आहे. त्याच बरोबर किल्याची माहिती देणारे फलकही सोबत लावलेले आहे. यंदा किल्याच्या मागील बाजूला त्यांनी शिवकालीन निवडक शस्त्र यांचे प्रदर्शन मांडले आहे. जेणेकरून शिवकालीन शस्त्र कसे होते याची माहिती मुलांना मिळावी, हा दृष्टीकोन ठेवला आहे. प्रभात नाईक हे पनवेल येथे प्राथमिक शिक्षक आहेत. तर त्यांचे मोठे भाऊ संतोष नाईक हे मुरुड आगारात वाहक या पदावर आहेत. किल्ल्याची प्रतिकृती तयार करताना ते प्रभात नाईक यांना मार्गदर्शन आणि मदत करीत असतात. किल्ला बनविताना त्यांचे वडील दत्तात्रेय नाईक यांची त्यांना नेहमी मदत होत असे. किल्ल्याला पाणी मारणे, झाडे लावणे, त्यात मेथी पेरणे जेणे करून झाडे उगवतील. त्याच बरोबर काही छोटी छोटी झाडे ते किल्यात लावीत असत.
यंदाची प्रतिकृती करण्यासाठी 2 बैल गाडी माती, रंग कागद याचा वापर त्यांनी केला आहे. घरी सलग 35 वर्ष किल्याची प्रतिकृती बनविण्याचा रेकॉर्ड त्यांनी मुरुड मध्ये केला आहे. आतापर्यंत त्यांनी जंजिरा, पद्मदुर्ग उर्फ कासा, सिंहगड, राजगड, रायगड, तोरणा, नळदुर्ग, कर्नाळा, प्रतापगड, भरतगड, सोनेरिगड, अजिंक्यतारा, मल्हार गड, विजयदुर्ग आदी प्रतिकृती त्यांनी तयार केल्या आहेत. किल्ल्यासोबत किल्ल्यावर आधारित काव्य, माहिती, फोटो, माहिती देणारे फलक अशी उभारणी ते करीत असतात.