नवीन पालवीने झाडांचे आकर्षण वाढले

| नेरळ | वार्ताहर |

माथेरान हे डोंगरावर वसलेले गाव असून या माथेरानच्या जंगलातील झाडे हि वर्षभर वेगवेगळा अनुभव देत असतात. प्रामुख्याने वसंत ऋतूमध्ये फुटणारी नवीन पालवी आणि त्यानंतर वेगेवेगळ्या रंगांची छाया माथेरानच्या डोंगरात अनुभवता येते. वसंत ऋतू ते वैशाख या काळातील झाडांमधील बदलाचा अभ्यास करण्यासाठी अभ्यासक यांच्या फेर्‍या वाढणार आहेत.

होळीपासून वसंताला सुरुवात झाली. तेव्हापासून माथेरानमधील निसर्ग मुक्तहस्ताने रंगांची उधळण करताना दिसत आहे. लांबलेली थंडी काहीशी कमी होत असताना नेरळ माथेरान घाटात नांगरखिंड परिसरात असलेली पळसाची झाडे फुलली आहेत. रानमोगर्‍याची फुले देखील या जंगलातील निसर्गाच्या शृंगारात भर घालताना दिसत आहेत. जिल्ह्यातील निसर्गाचा वरदहस्त लाभलेले आणि निसर्गवैभवाची मुक्तहस्ताने उधळण झालेल्या माथेरानच्या जंगलातील अनेक वृक्षात वेगळ्या बदलाच्या संक्रमणात असल्याचे दिसून येते. झाडांची पाने मागील महिन्यात खडुन गेली आहेत. त्यानंतर आता नवीन पाळावी फुटली असून माथेरान आणि त्याच्या अवतीभवतीच्या निसर्गात गेल्या काही दिवसांपासून डोळ्यांना सुखद अनुभव देणारे चित्र नजरेस पडते आहे. वृक्षांनी आपले रूपडे पूर्णतः पालटून टाकले आहे. हिरव्या गच्च असणार्‍या झाडांमधून कोवळी पालवी धारण करून रंगीबिरंगी छटा दिवसागणिक दिसत आहे.

वसंत सुरु झाला असून आता कोवळी पाने काही दिवसांनी गडद लाल पाने असे रंग बदलून पुन्हा आपल्या हिरव्या रंगाकडे मार्गक्रमण करत पाने पूर्वावस्था धारण करतात. निसर्गाचा हा प्रवास निसर्ग प्रेमींसाठी पर्वणी ठरत आहे. माथेरान 54 चौरस किलोमीटरमध्ये पसरले आहे. मात्र नेरळ माथेरान घाट वगळता अन्य ठिकाणी झाडे एकमेकांवर स्पर्धा करीत आहेत. नेरळ माथेरान घाटात झाडांमधील नवीन पालवीमुळे दिसणारी रंगांची उधळण बदल अनुभवता येेत आहे. रस्त्याच्याकडेला बागेत पिवळ्या झुपक्याचा बहावा दिसतो, कुठे जांभळ्या रंगाच्या कागदी फुलांचा ताम्हण लक्ष वेधतो तर कुठे पांगारा, काटेसावर, विविधरंगी बोगनवेल अशी विविध प्रकारची फुलझाडे बहरतात. अनेक झाडांच्या पानांनी रंग भरलेला दिसून येतो. असा रंगोत्सवात महिनाभर रंग खेळणारा निसर्ग आज माथेरानच्या अवतीभोवती दिसत आहे.

Exit mobile version