पळसदरीच्या सरपंचानेच दिली होती सुपारी

हत्येचा प्रयत्न करणार्‍या आरोपींना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून अटक

। अलिबाग । प्रतिनिधी ।

जमीनीच्या वादातून सुड घेण्याच्या भावनेने पळसदरीच्याच सरपंचाने हत्या करण्याची सुपारी दिल्याचे उघड झाले आहे. रायगडच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून हा गुन्हा उघडकीस करण्यात आला असून पोलीस सरपंचाच्या शोधात असल्याची माहिती पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी दिली.

अनिल देशमुख असे या जखमीचे नाव आहे. 25 जून रोजी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास ते व त्यांचे सहकारी नांगुर्ले येथून भिलवडे येथे जात होते. काही पाच जणांनी दुसर्‍या कारमधून येऊन माहिती विचारण्याचा बहाणा करीत देशमुख यांची कार थांबवली. त्यावेळी त्या मंडळींनी अनिल देशमुखसह अन्य जणांवर लोखंडी रॉडने हल्ला केला. वडीलोपार्जित जमीनीच्या वादावरून हा प्रकार घडल्याचा असल्याची माहिती समोर आली. याप्रकरणी कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सुमारे 12 जणांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला.

कर्जत पोलिसांनी योगेश देशमुख यास अटक केली. मात्र इतर काही जणांची माहिती मिळत नव्हती. अखेर त्या पाच जणांनी आत्मसमर्पण केले. परंतु याबाबत पोलिसांना संशय आला. योगेश याची सखोल चौकशी करण्यात आली. समर्पण करणारे खरे आरोपी नसल्याचे त्याने कबूल केले. जयेंद्र देशमुख याने पैसे व नोकरीचे अमिष दाखवून त्यांना गुन्ह्यात अडकण्यास सांगितले असल्याचे उघड झाले. परंतु हा गुन्हा गुंतागुंतीचा होऊ लागला. त्यामुळे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी हा गुन्हयाचा तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे सोपविला. पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांच्या नेतृत्वाखाली पथक तयार करण्यात आले. पथकाने सीसीटीव्ही व गोपनीय माहितीद्वारे पाच जणांची माहिती शोधून काढली. ते कल्याणमधील म्हारळ येथील रहिवासी असल्याचे उघड झाले. म्हारळमधून नंदेश खताते, शुभम कांगणे याला ताब्यात घेण्यात आले. पोलीसी दणका मिळाल्यावर जयेंद्र देशमुख आणि प्रशांत देशमुख यांच्या सांगण्यावरून त्यांनी हल्ला केल्याचे कबूल करण्यात आले. या दोघांचा शोध सुरु असल्याची माहिती पोलीस अधीक्षक घार्गे यांनी दिली.

Exit mobile version