वृक्षतोड, जलप्रदूषणांनी निसर्गाचा श्वास गुदमरला; पर्यावरणप्रेमींमध्ये चिंता व्यक्त
| माणगाव | प्रतिनिधी |
एकेकाळी हिरव्यागार डोंगररांगा, स्वच्छ जलस्त्रोत, दाट जंगलं आणि समृद्ध जैवविविधतेसाठी ओळखला जाणारा माणगाव तालुका आज पर्यावरणीय संकटाच्या उंबरठ्यावर उभा आहे. तालुक्यात सुरू असलेल्या बेकायदेशीर माती उत्खनन, बेसुमार भराव, जलप्रदूषण, अतिक्रमणे, नैसर्गिक जलस्त्रोत बंद करणे, बेछूट वृक्षतोड आणि वारंवार लागणारे वणवे यामुळे निसर्गाचे संतुलन ढासळत चालले असून पर्यावरणप्रेमींमध्ये तीव्र चिंता व्यक्त केली जात आहे.
तालुक्यातील अनेक भागांमध्ये दिवसाढवळ्या आणि रात्रंदिवस डोंगर पोखरण्याचे प्रकार सुरू असून, मोठ्या प्रमाणावर मातीचे उत्खनन करून नैसर्गिक रचना उध्वस्त केली जात आहे. यामुळे पावसाचे पाणी अडवणारे नैसर्गिक मार्ग नष्ट होत आहेत. परिणामी भूजल पातळी घटत असून नद्या, तलाव, विहिरी, ओढे आणि झरे उन्हाळ्यात कोरडे पडू लागले आहेत. अनेक गावांमध्ये पाणीटंचाईची समस्या अधिक तीव्र होत चालली आहे.
याशिवाय काही ठिकाणी नद्यांमध्ये आणि जलस्त्रोतांमध्ये बेकायदेशीर भराव टाकून त्यांचे प्रवाह रोखले जात असल्याचे चित्र आहे. माणगाव तालुक्याची जीवनवाहिनी काळ नदीच्या पात्रात मुंबई गोवा महामार्गाचे बायपास रस्ता करण्यासाठी आणि मोठे पुल उभारण्यासाठी मातीचे भराव टाकून कच्चे रस्ते तयार केले आहेत. काळ आणि गोद नदीच्या पाण्यावर माणगाव, निजामपूर, गोरेगाव आणि मोर्बा सहीत सुमारे 100 गावे अवलंबून आहेत. औद्योगिक सांडपाणी, प्लास्टिक कचरा आणि रासायनिक प्रदूषणामुळे पाणी दूषित होत असून जलचर जीवसृष्टीवर गंभीर परिणाम होत आहेत. मासे, बेडूक, पक्षी आणि इतर अनेक जीवांच्या अधिवासावर याचा थेट परिणाम होत असल्याचे पर्यावरण अभ्यासकांचे मत आहे.
तालुक्यात वाढत चाललेल्या अतिक्रमणामुळे जंगल क्षेत्र झपाट्याने कमी होत आहे. मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड होत असल्याने पक्ष्यांचे निवासस्थान नष्ट होत आहे. उन्हाळ्यात वारंवार लागणाऱ्या वणव्यांमुळे हजारो झाडे, औषधी वनस्पती आणि वन्यजीव भस्मसात होत आहेत. जंगलातील जैवविविधतेला हा मोठा धोका निर्माण झाला आहे. माणगाव तालुक्यातील निजामपूर, गांगवली परीसर हरीत पट्टा जाहीर केला असला तरी बेकायदेशीरपणे राजरोस अवैध मार्गाने अवैध मातीचे उत्खनन सुरू आहे. त्यामुळे जमिनीची मोठ्या प्रमाणात धुप होत असल्याने माणगाव शहराला दरवर्षी महापुराचा सामना करावा लागतो. तसेच अनेक गावांचा संपर्क तुटतो.
पर्यावरणातील या बदलांचा फटका सामान्य नागरिकांनाही बसू लागला आहे. मागील काही वर्षांत माणगाव तालुक्यात तापमानात लक्षणीय वाढ झाली असून उष्णतेची तीव्रता असह्य होत चालली आहे. हवामानातील बदलामुळे शेती उत्पादनावर परिणाम होत असून शेतकरी चिंतेत आहेत. पावसाचे अनियमित प्रमाण, वाढते उकाडे आणि पाण्याचा तुटवडा यामुळे ग्रामीण जीवन विस्कळीत होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
स्थानिक नागरिक, पर्यावरणप्रेमी आणि सामाजिक संघटनांनी प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करूनही अनेक ठिकाणी कारवाई होत नसल्याचा आरोप केला जात आहे. पर्यावरण वाचवण्यासाठी तातडीने कठोर पावले उचलण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. बेकायदेशीर उत्खनन आणि वृक्षतोड रोखणे, जलस्त्रोतांचे संरक्षण करणे, वणवे रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना करणे तसेच पर्यावरणीय नियमांची कठोर अंमलबजावणी करणे ही काळाची गरज असल्याचे मत व्यक्त होत आहे.
जनआंदोलन उभे करण्याची गरज
आज निसर्ग वाचवला नाही, तर उद्या माणसाचे अस्तित्वच धोक्यात येईल, अशी भावना आता सर्वसामान्य नागरिकांमधून व्यक्त होत आहे. माणगाव तालुक्याची पर्यावरणीय ओळख टिकवण्यासाठी लोकसहभागातून व्यापक जनआंदोलन उभे करण्याची गरज निर्माण झाली आहे.
