राष्ट्रप्रेमाचे धडे देणाऱ्या प्रदर्शनातच तिरंगा रांगोळी पायदळी; आमदारांसह भाजप पदाधिकाऱ्यांचे फोटोसेशन
| पनवेल | प्रतिनिधी |
भाजपची “लोका सांगे ब्रह्मज्ञान…” अशीच काहीशी अवस्था पनवेलमध्ये राष्ट्रप्रेमाचा संदेश देण्यासाठी आयोजित केलेल्या प्रदर्शनात पाहायला मिळाल्याचा आरोप आहे. एकीकडे ‘हर घर तिरंगा’च्या माध्यमातून नागरिकांना राष्ट्रध्वजाचा सन्मान करण्याचे आवाहन करायचे आणि दुसरीकडे जमिनीवर साकारलेल्या तिरंग्याच्या प्रतिकृतीभोवती बूट-चपलांसह उभे राहून छायाचित्रे काढायची, हा विरोधाभास संतापजनक असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. पनवेलच्या आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात झालेल्या प्रदर्शनातील हे छायाचित्र समोर आल्यानंतर “राष्ट्रध्वजाच्या सन्मानाचा उपदेश करण्यापूर्वी त्याचा सन्मान कृतीतून दाखवणार का?” असा थेट सवाल काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष सुदाम पाटील यांनी उपस्थित केला आहे.
वंदे मातरम् गीताला 150 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने ‘वंदे मातरम् भारताच्या स्वातंत्र्यलढ्याची हाक’ या विशेष माहिती प्रदर्शनाचे उद्घाटन गुरुवारी पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते झाले. यावेळी रायगड जिल्हा परिषद अध्यक्ष मंगेश वाकडीकर, महापौर नितीन पाटील, उपमहापौर प्रमिला पाटील, सभागृह नेते प्रकाश बिनेदार, जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, महापालिका सदस्य, अतिरिक्त आयुक्त गणेश शेटे, उपायुक्त डॉ. वैभव विधाते, मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. राजू पाटोदकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
प्रदर्शनाच्या ठिकाणी तिरंग्याची प्रतिकृती रांगोळीच्या माध्यमातून साकारण्यात आली होती. स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर देशभक्तीचा संदेश देण्यासाठी केलेली ही रांगोळी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली. मात्र, याच तिरंगा रांगोळीभोवती बूट-चपला घालून मान्यवर उभे राहिल्याचे छायाचित्र समोर आल्याने कार्यक्रमाच्या उद्देशालाच छेद गेल्याची टीका सुरू झाली आहे.
राष्ट्रध्वजाचा सन्मान हा केवळ घोषणा, भाषणे आणि अभियानांपुरता मर्यादित नसतो. राष्ट्रध्वजाची प्रतिकृती साकारताना तिची प्रतिष्ठा आणि सन्मान यांचीही काळजी घेणे अपेक्षित असते. मग फोटो काढण्यासाठी तिरंग्याच्या प्रतिकृतीपासून दोन पावले दूर उभे राहणे एवढेही अवघड होते का, असा सवाल आता उपस्थित होत आहे.
विशेष म्हणजे, हा एखादा सामान्य सार्वजनिक कार्यक्रम नव्हता. स्वातंत्र्यलढ्याची माहिती, वंदे मातरम् आणि राष्ट्रप्रेमाचा संदेश देण्यासाठी आयोजित केलेले प्रदर्शन होते. अशा कार्यक्रमातून नागरिकांना राष्ट्रीय प्रतीकांचा सन्मान करण्याचा आदर्श घालून देणे अपेक्षित असताना, त्याच ठिकाणी झालेल्या या फोटोसेशनमुळे आयोजकांची संवेदनशीलता कुठे होती, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
एकीकडे नागरिकांनी घराघरांत तिरंगा फडकवावा, राष्ट्रध्वजाचा सन्मान करावा, देशभक्तीची भावना जागवावी, अशी आवाहने केली जातात. मात्र, त्याच तिरंग्याची प्रतिकृती जमिनीवर साकारून तिच्याभोवती बूट-चपलांसह उभे राहून छायाचित्रे काढली जात असतील, तर नागरिकांनी नेमका कोणता आदर्श घ्यायचा? असा सवाल सुदाम पाटील यांनी केला. राष्ट्रप्रेमाचा आव आणणे सोपे; पण राष्ट्रध्वजाबद्दलची संवेदनशीलता प्रत्यक्ष कृतीतून दाखवणे महत्त्वाचे आहे. देशभक्ती ही फक्त घोषणांमध्ये आणि फलकांवर नको, ती वर्तनातूनही दिसली पाहिजे, अशी टीकाही यानिमित्ताने होत आहे.
तिरंगा फोटोचा की सन्मानाचे प्रतीक?
राष्ट्रध्वजाच्या सन्मानाचे धडे नागरिकांना देणाऱ्यांनीच राष्ट्रीय प्रतीकांबाबत अधिक काळजी घेणे अपेक्षित असते. तिरंगा रांगोळी जमिनीवर साकारण्यापूर्वी तिची मांडणी आणि त्याभोवतीचे नियोजन योग्य पद्धतीने करता आले असते. फोटोसेशनसाठी तिरंग्यापासून अंतर ठेवण्याची साधी खबरदारीही घेता आली असती. मग ती का घेतली गेली नाही? हा प्रश्न केवळ राजकीय आरोपांचा नसून राष्ट्रीय प्रतीकांबाबतच्या संवेदनशीलतेचा आहे.
‘तिरंग्याचा सन्मान’ कृतीतून दिसावा
दरम्यान, या छायाचित्राबाबत पनवेल महानगरपालिका प्रशासन आणि संबंधित मान्यवरांची भूमिका काय आहे, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. राष्ट्रप्रेमाचा संदेश देणाऱ्या कार्यक्रमातच तिरंग्याच्या प्रतिकृतीच्या सन्मानाबाबत प्रश्न निर्माण झाल्याने आयोजकांनी याचे गांभीर्याने स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी होत आहे.






