जयगडमधील बेपत्ता नौकेवरील एकाचा मृतदेह सापडला

। रत्नागिरी । वृत्तसंस्था ।
तालुक्यातील जयगड येथून पाच दिवसांपूर्वी मच्छीमारीसाठी गेलेल्या नौकेवरील सहापैकी एका खलाशाचा मृतदेह गुहागर किनार्‍यापासून 20 नॉटिकल खोल समुद्रात आढळून आल्याची माहिती जयगड पोलिस ठाण्याचे सहा.पोलिस निरीक्षक जे. एच. कळेकर यांनी दिली आहे. अनिल आंबेरकर (50) असे मृत खलाशाचे नाव आहे.
नासीर हुसेनमियॅा संसारे यांच्या मालकीची नावेद ही मच्छीमारी नौका 26 ऑक्टोबरला जयगड बंदरातून मासेमारीसाठी रवाना झाली होती. गेले काही दिवस बेपत्ता असलेल्या या नौकेचा शोध जयगड पोलीस यंत्रणा करत आहे. या बोटीवर बेपत्ता खलाशांमध्ये दत्तात्रय झगडे, दगडू तांडेल, अनिल आंबेरकर, गोकुळ नाटेकर, अमोल जाधव, सुरेश कांबळे आदींचा समावेश आहे.
याविषयी पोलिसांत तक्रार दाखल झाल्यानंतर नौकेचा शोध घेण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. तटरक्षक दलालाही याची माहिती देण्यात आली असून दुपारच्या सुमारास मच्छीमारांना समुद्रात काहीतरी तरंगताना दिसले. लागलीच कोस्टगार्डने पाहणी केली. यामध्ये एक मृतदेह हाती लागला. यामुळे नौकेला जलसमाधी मिळाली असावी, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Exit mobile version