नेरळ | प्रतिनिधी |
माथेरान मधून 26 सप्टेंबर रोजी बेपत्ता झालेल्या तरुणाचा मृतदेह माथेरान मधील लुईझा पॉईंटच्या डाव्या बाजूच्या दरीत सापडला. मुंबई येथील 18 वर्षीय तरुण हा फिरण्यासाठी माथेरान येथे आला होता.रविवार 26 सप्टेंबर रोजी सकाळी फिरण्यासाठी गेला तो माथेरान येथून बेपत्ता झाला.माथेरान पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली त्याची शोध मोहीम सुरू झाली.सोमवारी 27 सप्टेंबर रोजी संपूर्ण दिवस शोध मोहीम सुरू होती.ड्रोन कॅमेरे याची मदत ही घेण्यात आली.परंतु डोंगर-दर्यातून वाढलेले गवत आणि पावसाळी असलेले दाट धुके यामुळे त्याचा ठावठिकाणा काही लागला नाही.
शनिवार दि.2 ऑक्टोबर रोजी लुईझा पॉईंटच्या दरातील आदिवासी भागातील बांधव हे आपली गाई गुरे घेऊन त्या परिसरात फिरत असताना त्यांना त्या परिसरात दुर्गंधी,वास येऊ लागला त्यावेळी त्यांनी लगेच माथेरान पोलीस ठाण्यात संपर्क केला.पोलीस लगेच घटनास्थळी पोहचले.संध्याकाळ झाली असताना मृतदेह अडकलेल्या ठिकाणी जाणे फार जिकरीचे होते.सहायक पोलिस निरीक्षक संजय बांगर व दंगल विरोधी पथकाचे जवान हे खोल दरीमध्ये गेले पण तिथपर्यंत पोहोचणे जमले नाही.सह्याद्री रेस्क्यू टीमच्या अथक प्रयत्नाने त्यांनी पहाटे तीन वाजता तो मृतदेह दरी बाहेर काढला हा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत होता.व रात्रीची वेळ असल्यामुळे त्यांना खुपच परिश्रम घ्यावे लागले.त्या युवकाचा मृतदेह अखेर पहाटे चार वाजता माथेरान मधीलबी.जे हॉस्पिटलमध्ये नेण्यात आला.त्याच्या अंगावरील कपडे,त्याच्या हातामधील घड्याळ,त्याच्या कमरेला असलेला बेल्ट व मोबाईल ह्या सर्व मिळालेल्या पुरव्याने हा मृतदेह रविवारी 26 सप्टेंबर रोजी बेपत्ता झालेल्या तरुणाचा आहे हे पोलिसांच्या निदर्शनास आले. आज शवविच्छेदना नंतर मृतदेह नातेवाईकांच्या सुपूर्त करण्यात आला.