राष्ट्रीय महामार्ग रस्त्यावर सापडला मृतदेह

जिवे ठार मारून टाकल्याचा गुन्हा दाखल

| नेरळ | बातमीदार |

शहापूर मुरबाड कर्जत राष्ट्रीय महाराज 548 अ या रस्त्याच्या कडेला तरुणाचा मृतदेह आढळून आला आहे. साधताना 25 ते 27 वयोगटातील तरुणाचा मृतदेह हातपाय बांधलेल्या अवस्थेत आणि चाकुचे वार केलेल्या स्थितीत आढळून आल्याने कर्जत पोलिसांनी तपासाची चक्रे फिरविली आहेत. मृतदेहाची ओळख पटवून देण्यासाठी कर्जत पोलिसांनी शोध पत्रिका प्रसारित केली आहे.

मुरबाड कर्जत राष्ट्रीय महामार्ग रस्त्यावर सुगवे – कशेले या भागात नालढे गावाच्या हद्दीत अबासा फार्म हाऊसच्या बाजूला रस्त्याच्या डाव्या बाजूला मृतदेह पडला असल्याची माहिती कशेले येथील आऊट पोस्ट येथे सायंकाळी सात वाजता मिळाली. 29 फेब्रुवारी रोजी रात्री ही माहिती मिळताच कर्जत पोलीस ठाण्याचे अधिकारी कर्मचारी कशेले येथे पोहचले. त्यावेळी पोलीस उप अधीक्षक टी. डी. टेळे आणि कर्जत पोलीस निरीक्षक प्रभारी अधिकारी सुरेंद्र गरड, सहायक पोलिस निरीक्षक तोसिफ सय्यद, हे आपल्या पोलीस अधिकारी कर्मचारी यांच्यासह घटना स्थळी पोहचले. रात्री नऊ वाजता नेरळ पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी शिवाजी ढवळे हे देखील आपल्या कर्मचारी वर्गासह पोहचले. रस्त्याच्या अगदी बाजूला हात पाय बांधलेली व्यक्ती मृत अवस्थेत आढळून आली. त्या व्यक्तीच्या माने वर तीक्ष्ण हत्यारांच्या खुणा स्पष्ट दिसून येत होत्या. त्यामुळे कर्जत पोलीस ठाणे येथे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

25 ते 27 वर्षे वयाची या व्यक्तीचे अंगावर टी शर्ट तर डाव्या हाताच्या पोटरी वर असे इंग्रजी अक्षरात गोंदवले आहे. तर छातीवर इंग्रजी अक्षरात आय लव्ह मॉम, आय लव्ह डॉड असे गोंदवले आहे. या तरुणाच्या खुनाची उकल करण्यासाठी कर्जत पोलिसांनी सहा टीम गुन्ह्याच्या प्रकटीकरण करण्यासाठी केल्या आहेत. त्याचवेळी मुरबाड कर्जत रस्त्यावर येणाऱ्या वाहनांची माहिती घेण्यासाठी त्या भागातील सीसीटिव्ही फुटेज तपासण्याचे काम सुरू आहे. तर तो मृतदेह संध्याकाळचे वेळी टाकण्यात आला असावा अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे कर्जत पोलीस यांच्यासाठी आव्हानात्मक असलेल्या या खुनाचा उलगडा होण्यासाठी सर्व पोलीस यंत्रणा कामाला लागली आहे.

Exit mobile version