नऊ जागांसाठी 12 मे रोजी मतदान
| मुंबई | प्रतिनिधी |
महाराष्ट्र विधानपरिषदेच्या रिक्त होणाऱ्या नऊ जागांसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रमाची घोषणा केली आहे. विधानपरिषदेच्या नऊ जागांसाठी 23 एप्रिलपासून अर्ज दाखल करता येणार असून, 12 मे रोजी मतदान होणार आहे. मतदानाच्या दिवशीच सायंकाळी 5 वाजता मतमोजणी होणार आहे.
उद्धव ठाकरे, शशिकांत शिंदे यांच्यासह नऊ आमदारांचा कार्यकाळ 13 मे रोजी संपुष्टात येणार असल्याने रिक्त होणाऱ्या जागांसाठी ही निवडणूक होत आहे.
या निवडणुकीत निवृत्त होणाऱ्या सदस्यांमध्ये संजय किशनराव केनेकर (भाजप), नीलम दिवाकर गोऱ्हे (शिंदे गट), उद्धव बाळासाहेब ठाकरे (शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), संदीप दिवाकर जोशी, दादाराव यादवराव केचे (भाजप), अमोल रामकृष्ण मिटकरी (अजित पवार गट), रणजितसिंह विजयसिंह मोहिते-पाटील (भाजप), राजेश धोंडीराम राठोड (काँग्रेस) आणि शशिकांत जयवंतराव शिंदे (शरद पवार गट) यांचा समावेश आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार, 23 एप्रिलपासून उमेदवारी अर्ज दाखल करता येणार असून, 30 एप्रिल ही उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख असणार आहे. 2 मे 2026 रोजी अर्जांची छाननी करण्यात येणार आहे, तर 4 मे हा उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. विधानपरिषद निवडणुकीसाठी 12 मे 2026 रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत मतदान होणार असून, त्याच दिवशी सायंकाळी 5 वाजता मतमोजणीला प्रारंभ होईल. दरम्यान, विधानसभेत असणाऱ्या संख्याबळानुसार विधानपरिषद निवडणुकीत 9 जागांपैकी 5 जागा भाजपच्या वाट्याला, 2 जागा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला, 1 जागा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या राष्ट्रवादीला आणि महाविकास आघाडीतील तीन पक्षांत मिळून एक जागा मिळण्याची शक्यता आहे.
