बस वाहकाचा प्रामाणिकपणा

पैशांनी भरलेली पर्स केली परत

| अलिबाग | प्रतिनिधी |

माणगाव येथील रसिका शिंदे आणि वैशाली शिंदे या दोघी महाड-मुरुड या बसमधून प्रवास करत होत्या. त्या रेवदंडा येथे उतरल्यानंतर त्यांना आपली पैशांनी भरलेली पर्स बसमध्येच विसरल्याचे लक्षात आले. त्या पर्समध्ये सुमारे साडेपाच हजार रुपये रोख रक्कम, आधारकार्ड, पॅनकार्ड, एटीएमकार्डसह महत्त्वाची कागदपत्रे होती. त्यानंतर रसिका शिंदे यांनी राकेश काठे यांच्याशी संपर्क साधून संपूर्ण प्रकार सांगितला. त्यानंतर राकेश काठे यांनी बोर्ली येथे राहणाऱ्या आपल्या मित्राशी संपर्क साधला आणि संबंधित बस मुरुडहून बोर्लीकडे जात असताना ती थांबवून बसचे वाहक कैलास इंगळे यांच्याकडे पर्सबाबत चौकशी केली. कैलास इंगळे यांनी तत्परता दाखवत संबंधित पर्स सुरक्षित असल्याचे सांगितले. पर्सची ओळख पटवल्यानंतर त्यांनी ती सर्व साहित्यांसह सुखरूप परत केली. रोख रक्कम व महत्त्वाची कागदपत्रे अबाधित अवस्थेत मिळाल्याने शिंदे कुटुंबीयांनी सुटकेचा निःश्वास सोडला. बस वाहक कैलास इंगळे यांनी दाखविलेल्या प्रामाणिकपणा आणि कर्तव्यदक्षतेचे सर्व स्तरांतून कौतुक होत असून, त्यांच्या या कृतीमुळे समाजासमोर प्रामाणिकतेचा आदर्श निर्माण झाला आहे.

Exit mobile version