प्रशासनाचे दुर्लक्ष, कर्मचार्यांकडून भाडेवसुली
| पेण | प्रतिनिधी |
पेण हे सुनियोजित शहर नसून ऐतिहासिक शहर असल्याने पेण शहरातील अंतर्गत रस्ते हे रुंदीने छोटे आहेत. गल्लीबोळाचे आहेत. प्रशासनाने कितीही ठरविले तरी पेण शहरामध्ये रोड वाइंडिंग होऊ शकत नाहीत. आणि, ज्या काही ठिकाणी कमी-जास्त रोड वाइंडिंंग झाले, त्या ठिकाणी हातगाडीवाल्यांनी व टपरीवाल्यांनी अतिक्रमण करुन निम्मे रस्ते गिळंकृत केले आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे, पेण शहराचा विचार करता आजच्या तारखेला 270 टपर्या व हातगाड्या अनधिकृतरित्या उभ्या आहेत. या टपर्या उभ्या राहण्यामागे नगरपालिकेच्या कर्मचार्यांचा मोठा आशीर्वाद आहे, असा आरोप पेणकरांकडून करण्यात येत आहे.
गेल्या महिनाभरात विधानसभा निवडणुकीच्या काळात टपर्या वाढण्याचे प्रमाण वाढले आहे. ए.टी. पाटील चौकापासून ते कोतवाल चौकापर्यंत (धरमतर रोड) रस्त्याच्या दुतर्फा टपर्या आणि हातगाड्यांनी अतिक्रमण केले आहे. मोरेश्वर चित्रमंदिराच्या समोर तर सतत वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण होतो. कारण, मोरेश्वर चित्रमंदिरच्या भिंतीला लागून पूर्णत: अनधिकृत हातगाड्या उभ्या आहेत. नगरपालिका मैदानाच्या व स्विमिंग पूलच्या मधल्या पॅसेजमध्ये चिंचपाडा प्रायव्हेट हायस्कूल रस्त्यावर, म्हाडा कुंभारआळी रस्त्यावर, भुंडापूल नंदीमाळ नाका रस्ता, आंबेगाव भोगावती पूल रस्ता ते चावडीनाका थिंमपार्क, म्हाडा कॉलनी, अंतोरा रोड ते कोतवाल चौक, राजूपोटे मार्ग, उर्दू शाळा ते नगरपालिका मैदान, छत्रपती संभाजी महाराज चौक या सर्व रस्त्यांवर अनधिकृत टपर्यांचे साम्राज्य पहायला मिळत आहे. हे कमी होते म्हणून की काय तर पेण कौंवडाळ तळ्यावरदेखील सभोवताली टपर्या पहायला मिळतात. ज्या उद्देशाने कौंवडाळ तळ्यावरील 45 कुटुंबियांना उठविले होते, तो उद्देश अशा अनधिकृत टपर्या उभ्या करुन पूर्ण झाला का, असा प्रश्न नागरिकांकडून विचारण्यात येत आहे.
एका टपरीमागे 2000 हजार रुपये महिन्याला भाडे आकारले जात आहे, अशी माहिती आहे. त्यामुळे 270 गुणिले 2000 असा विचार केल्यास जवळपास 5,40,000 रुपये भाडे कुणाच्या खिशात जाते हा, मोठा संशोधनाचा विषय आहे. टपरीधारकांना विचारल्यानंतर ते कुणाचे नाव सांगत नाही. कारण, नाव सांगितले तर आमची टपरी उठवतील, असे ते सांगतात. एकंदरीत, या अनधिकृत टपरीधारकांच्या मागे नगरपालिका कर्मचारी तसेच आजी- माजी लोकप्रतिनिधींचा हात असल्याचे नाकारता येणार नाही.
गेल्याच आठवड्यात प्रचार सभेसाठी राज्याचे उपमुख्यमंत्री पेण शहरात आले असता पेण नगरपालिका मैदानाच्या बाजूच्या असलेल्या टपर्या (खाऊगल्ली) उठवण्यात आली. परंतु, प्रचार करुन उपमुख्यमंत्र्यांची पाठ फिरत नाही तोच टपर्या पुन्हा होत्या तशाच झाल्या. याचाच अर्थ, अधिकारीवर्गाचा वदरहस्त या टपर्याधारकांना आहे, एवढे निश्चित. पेण नगरपालिका ठेकेदार या टपरीधारकांकडून दिवसाला 30 रुपये याप्रामाणे भाडे आकारुन पावती देत असतो आणि हीच पावती टपरीधारक परवाना असल्यासारखे मिरवत असतात. एकंदरीत, पेण शहरात रस्ते अरुंद होण्यामागे व वाहतूक कोंडी होण्यामागे या अनधिकृत टपर्या व हातगाड्यांचा सिंहाचा वाटा आहे. वेळेस या टपर्याधारकांवर जर आळा घातला नाही, तर बाप्पाची नगरी ही ओळख पुसून टपर्यांचे शहर म्हणून ओळखले जाऊ शकते.
सब माया की माया है!
पेण शहरामध्ये 270 ते 280 अनधिकृत टपर्या व हातगाड्या आहेत. या टपर्याधारकांना अधिकारी व कर्मचार्यांचा छुपा पाठिंबा असल्याने आज अनधिकृत टपर्यांचे पीकच जणू काही पेण शहरामध्ये दिसून येत असल्याची चर्चा आहे. पेणच्या नाक्या-नाक्यावर कुजबूज आहे की, एका टपरीमागे महिन्याला दोन हजारप्रमाणे भाडे कर्मचारी आकारत आहेत. यातील काही हिस्सा अधिकार्यांना दिला जातो, असे बोलले जाते. त्यामुळे 250 टपर्या जरी पकडल्या तरीही महिन्याला 5 लाख रुपये जमा होतात. त्यामुळे अनधिकृत टपरी मालकदेखील उजळ माथ्याने तक्रार करणार्यांच्या विरुध्द आमचे तुम्ही काही वाकडे करू शकत नाहीत अशा वलगना करतात. याचाच अर्थ, ‘ये सब माया की माया है’. या बाबत विचारणा करण्यासाठी वारंवार प्रशासक तथा मुख्याधिकारी जीवन पाटील यांना भ्रमणध्वनीवरुन संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र, संपर्क काही होऊ शकला नाही. समोरुन वॉईस मॅसेज टाकण्याचे रेकॉडिंग ऐकायला येत होते.