गाडी खासगी, रुबाब सरकारी

| उरण | प्रतिनिधी |

रायगड जिल्ह्यात खासगी वाहनांवर ‌‘आमदार‌’, ‌‘महाराष्ट्र शासन‌’ तसेच अशोकस्तंभाचे चिन्ह लावून फिरणाऱ्यांचा सुळसुळाट झाल्याची चर्चा होत आहे. जिल्ह्यात अशा प्रकारची 50 हून अधिक वाहने फिरत असल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे, काही वाहनांवर गोवा पासिंगचे क्रमांकही असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे खासगी वाहनांवर सरकारी पदनाम आणि राष्ट्रीय चिन्ह वापरण्याचा अधिकार नेमका कोणी दिला, असा सवाल उपस्थित होत आहे.

रायगड जिल्ह्यातील सर्वच विधानसभा मतदारसंघांत अशा प्रकारचे लोगो आणि पदनाम लावलेली वाहने फिरताना दिसत असल्याची चर्चा आहे. ही वाहने जिल्हाधिकारी कार्यालय, पोलीस अधीक्षक कार्यालय, जिल्हा परिषद तसेच अन्य शासकीय कार्यालयांच्या आवारातही ये-जा करत असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे या वाहनांची अधिकृतता तपासली जाते का? की वाहनावरील अशोकस्तंभ आणि पदनाम पाहूनच त्यांना सरकारी थाट दिला जातो? असा सवाल उपस्थित केला जात आहे. विशेष म्हणजे, अशा लोगोचा वापर केवळ रुबाब मिरवण्यासाठीच नव्हे, तर काही वाहनचालकांकडून टोल नाक्यांवर टोल चुकवण्यासाठीही होत असल्याची चर्चा आहे. जर नियमबाह्य पद्धतीने टोलमाफीचा लाभ घेतला जात असेल, तर संबंधित टोल प्रशासन आणि परिवहन विभागानेही याची दखल घेणे आवश्यक आहे. यापेक्षाही गंभीर बाब म्हणजे, अशा वाहनांचा वापर करून एखादी अनुचित घटना घडल्यास जबाबदारी कोणाची? वाहनावर आमदार किंवा महाराष्ट्र शासनाचे नाव असल्यामुळे पोलिसांची दिशाभूल होऊ शकते. एखाद्या गुन्ह्यात अशा वाहनाचा वापर झाला किंवा सरकारी ओळखीचा गैरफायदा घेतला गेला, तर त्याची जबाबदारी संबंधित वाहनधारकासह तपास यंत्रणांवरही येऊ शकते. त्यामुळे रायगड परिवहन विभाग, पोलीस अधीक्षक कार्यालय आणि जिल्हा प्रशासनाने संयुक्तपणे अशा वाहनांची तपासणी करावी, अशी मागणी जोर धरत आहे.

Exit mobile version