। अलिबाग । प्रतिनिधी ।
रायगड जिल्ह्यात वाढत्या तापमानामुळे जनजीवन विस्कळीत होऊ लागले आहे. नागरिकांबरोबरच गुरांनादेखील त्याचा त्रास जाणवू लागला आहे. त्यामुळे अनेक गुरे उन्हापासून बचाव करण्यासाठी भर दुपारी सावलीचा आधार घेत असल्याचे दिसून येत आहे.
जिल्ह्यामध्ये उन्हाचा तडाखा प्रचंड वाढू लागला आहे. 36 अंश सेल्सिअसवरून 40 अंश सेल्सिअस इतके तापमान वाढत आहे. सकाळी दहा वाजल्यापासून उन्हाचे चटके बसत आहेत. त्यामुळे उन्हात जाणेदेखील अनेकजण टाळत आहेत. उन्हापासून बचाव करण्यासाठी काहीजण मफलरचा आधार घेत आहेत. तर, काही जण थंड पेय पिऊन शरीरात गारवा निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत.
उन्हामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. दुपारच्यावेळा घरातून बाहेर पडणेदेखील टाळले जात आहे. नागरिकांबरोबरच ग्रामीण भागात असलेल्या गाय, बैल सारख्या गुरांनादेखील उन्हाचा फटका बसत आहे. गुरे सावलीच्या शोधात आहेत. ज्या ठिकाणी झाडाची सावली मिळेल त्याठिकाणी बसून दुपारी गुरे सावलीचा आधार घेत आहेत. अनेक वेळा रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडांजवळ अथवा, मोकळ्या जागेमध्ये जंगलभागात असलेल्या झाडांजवळ एकजूटीने गुरे सावलीचा आधार घेताना दिसून येत आहेत.