‘ते’ विद्यार्थी पुन्हा रुग्णालयात

जेएसडब्ल्यूतील वायुगळतीमुळे बाधित

| रत्नागिरी | प्रतिनिधी |

जयगडमधील जेएसडब्ल्यू पोर्ट परिसरात झालेल्या वायू गळतीमुळे जयगड हायस्कूलमधील विद्यार्थ्यांना त्याचा फटका बसला होता. घटनेनंतर 70 मुलांवर उपचार करण्यात आले होते. परंतु, अद्यापही काही मुलांना त्रास होत असून, रुग्णालयातून घरी गेल्यानंतरही पुन्हा त्रास होत असलेल्या 17 मुलांना खासगी रुग्णालयात पालकांनी दाखल केले आहे. त्यामुळे पालकांमध्ये या घटनेबाबत मुलांवर विपरीत परिणाम होतील की काय, अशी भीती वाटू लागली आहे.

जयगडमधील जेएसडब्ल्यू पोर्ट परिसरातील एलपीजी फॅसिलिटीमधून एलपी गॅस वाहतूक होत असते. याच भागात चार दिवसांपूर्वी वायू गळती झाली होती. याचा परिणाम जवळच असणार्‍या जयगड विद्यामंदिर आणि ज्युनिअर कॉलेजमधील विद्यार्थ्यांवर झाला होता. जवळपास 70 मुलांना उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालय आणि खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या विद्यार्थ्यांना उलट्या, मळमळ, पोटदुखी असे त्रास होत असल्याने मुले अस्वस्थ झाली होती. एका विद्यार्थिनीला आयसीयूमध्ये ठेवण्यात आले होते. या घटनेमुळे पालक वर्गामध्ये मोठी भीती पसरली होती. दोन दिवसांच्या उपचारानंतर या विद्यार्थ्यांना रुग्णालयामधून घरी सोडले होते. घरी सोडण्यात आलेल्या काही विद्यार्थ्यांना पुन्हा त्रास होऊ लागला आहे. काही नवे विद्यार्थी आहेत. रविवारी रात्री पाटदुखी, मळमळणे यामुळे मुले अस्वस्थ झाली होती. त्यामुळे त्यांना खासगी रुग्णालयात पालकांनी दाखल केले. सोमवारीही काही मुलांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यामुळे या विद्यार्थ्यांची संख्या 17 वर पोहोचली आहे. या विद्यार्थ्यांना त्रास वाटल्याने पालकांनी त्यांना उपचारासाठी दाखल केल्याचे खासगी रुग्णालयातील उपचार करणार्‍या डॉक्टरांनी सांगितले.

शाळेच्या जवळच एलपीजी वाहतूक करणार्‍या टँकरचा तळ असून, हा तळ शाळेजवळून हटवण्यात यावा, अशी मागणी शाळेच्यावतीने पदाधिकारी आणि शिक्षकांनी केली आहे. या विद्यार्थ्यांची प्रकृती ठिक असून, त्यांना पोटदुखी, डोकेदुखी व मळमळण्याचा त्रास होत आहे. विविद्य तज्ज्ञ डॉक्टरांनी त्यांची तपासणी केली असल्याचे खासगी डॉक्टरांनी सांगितले. याबाबत प्रशासनाला माहिती देण्यात आली असून, पोलिसांनी त्यांचे जबाब नोंदवले आहेत. दरम्यान, कंपनीच्या अधिकार्‍यांनी विद्यार्थ्यांवर योग्य उपचार करण्याबाबत रुग्णालयात भेट देऊन सांगितले असल्याचे वैद्यकीय अधिकार्‍यांनी सांगितले.

Exit mobile version