महायुतीतील घटक पक्षांचे सूर जुळेणा?

श्रीरंग बारणे यांची धाकधूक वाढली

| नेरळ | प्रतिनिधी |

मावळ लोकसभा मतदारसंघात कर्जत विधानसभा मतदारसंघ महायुतीचे उमेदवार यांच्यासाठी सतत अडचणीचे ठरत आहे. निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात असताना देखील महायुतीमधील घटक पक्षांचे काही पटताना दिसत नाही. प्रचारात शिवसेनेसोबत भारतीय जनता पक्ष तसेच राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून प्रचारात सहभाग घेतला जात आहे. मात्र, तरीदेखील महायुतीमधील घटक पक्षांचे सूर काही मिळाले नाहीत असेच चित्र आहे. निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या चारही घटक पक्षांसोबत स्वतंत्र बैठका लावल्या आहेत. दरम्यान, महायुतीतील असे जुळणारे सूत मतपेटीत परावर्तित दिसणार का? याचे टेन्शन महायुतीचे उमेदवार यांना असणार आहे.

कर्जत विधानसभा मतदारसंघात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस तसेच शिवसेना आणि भारतीय जनता पक्षामधील काही कार्यकर्त्यांचे जमत नसल्याचे जग जाहीर आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस,शिवसेना आणि भाजप हे तिन्ही पक्ष विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी सज्ज आहेत. मात्र, लोकसभा निवडणुकीत महायुतीमधील नेत्यांनी सर्व मतभेद विसरून अबकी पार 400 पार साध्य करण्यासाठी महायुतीच्या नेत्यांच्या सूचनेनुसार एकमेकांचे तोंड न पाहणारे महायुतीमधील तिन्ही घटक पक्षांचे नेते लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचे निमित्ताने एकत्र आलेले दिसत आहे. सध्या प्रचार सुरु असल्याने महायुतीमधील पक्षांचे पदाधिकार्‍यांनी सहभाग घेतल्याचे दिसून येत होते. त्यामुळे सर्व काही ठीकठाक आहे असे महायुतीत सुरु आहे. त्यामुळे उमेदवार यांच्या तालुका दौर्‍यात सर्व पक्षांचे नेते आणि कार्यकर्ते हे संयुक्त प्रचार सभेत एकत्र दिसतील असा सर्वसामान्य मतदारांचा कायस होता. मात्र, मावळ लोकसभा निवडणुकीचा प्रचार संपताना तरी असे चित्र कर्जत विधानसभा मतदारसंघात दिसून येईल कि नाही अशी शंका मात्र नाकी आहे.

महायुतीमधील चारही प्रमुख घटक पक्ष असलेल्या शिवसेना,राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय जनता पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेने या पक्षांचे कार्यकर्त्यांचे मनोमिलन शेवट पर्यंत होणार नाही असे काहीसे चित्र कर्जत तालुक्यात सध्या तरी आहे. तीन मे नंतर आठ मे रोजी उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारासाठी महारॅली आयोजित केली आहे. तीन मे रोजी न दिसणारी महायुतीची संयुक्त ताकद किमान आठ मे रोजी तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद प्रभाग आणि कर्जत शहारत फिरताना पाहायला मिळेल काय? हा प्रश्‍न सध्या तरी अनुत्तरित राहणार आहे.

Exit mobile version