महामार्गाची अवस्था अजून बिकट

मंत्र्यांचे पाहणी दौऱ्यातून फोटो सेशन; खड्डेमुक्त करण्याचे फक्त आश्वासन

| पेण | प्रतिनिधी |

14 जुलै रोजी बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांचा मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचा पाहणी दौरा झाला होता. आज बरोब्बर 21 व्या दिवशी पुन्हा एकदा मंत्री महोदयांचा पाहणी दौरा झाला आहे. दरम्यानच्या काळात मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गामध्ये बदल एवढेच झाले लहान खड्डे होते ते मोठे झाले, अनेकांच्या गाड्यांचे टायर फुटले, अनेकांना मणक्याचा त्रास वाढला. मात्र, रस्त्याच्या सुधारणेबाबत कोणतीच ठोस पावले उचलली गेली नाहीत.

खारपाड्याच्या अलीकडे सुरू असलेल्या एक लेनचे काम कित्येक दिवस कासव गतीने सुरू आहे. जर बंद आहे असे म्हटले तरी वावगं ठरणार नाही. नक्की मंत्री महोदय पाहणी दौरा करून काय साध्य करत आहेत, असा प्रश्न कोकणवासियांना पडलेला आहे. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचा पहिला टप्पा म्हण्ाजे जिवघेणी कसरत. आज समाज माध्यमांवर एवढ्या मोठ्या प्रमाणात मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाची चर्चा सुरू आहे, मात्र त्याबाबत सरकारला व प्रशासनाला काही घेणं-देणं नाही.

समृध्दी महामार्गावर अपघात झाल्यास अपघातग्रस्तांच्या नातेवाईकांना त्वरित आर्थिक मदत केली जात आहे. मात्र, कोकणवासियांचे गेल्या 13 वर्षांत कित्येक संसार उद्ध्वस्त झाले आहेत. मात्र त्यांना आर्थिक मदत सोडाच, त्यांची शासनामार्फत विचारपूसदेखील होत नाही, असा आरोप करण्यात येत आहे. बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी 14 जुलैला जे आश्वासन दिले होते, तेच आश्वासन पुन्हा आजदेखील दिले आहे. परंतु, खड्ड्यांची अवस्था आधीपेक्षा बिकट असून, रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. प्रवास करताना वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे, त्याचं काय, असा प्रश्न नागरिक करीत आहेत.

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर केवळ खड्डे बुजवण्याचं नव्हे, तर नवीन टेक्नोलॉजीच्या सहाय्याने कायमस्वरूपी उपाय म्हणून या संपूर्ण सिंगल लेनच्या काँक्रिटीकरणाचे काम सुरू आहे. गेली अनेक वर्षे मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचं काम रखडलं होतं, यामध्ये अनेक अडचणी येत होत्या. पण या सगळ्या अडचणींना आता पूर्णविराम मिळाला असून, येत्या गणेशोत्सवापर्यत कोकणवासियांसाठी ही सिंगल लेन सुरू होईल, अशी खात्री आहे.

रवींद्र चव्हाण, सार्वजनिक बांधकाम मंत्री

खड्डे बुजविण्यासाठी आता काम नाही..
खड्डे बुजवण्यासाठी आता काम करतच नाही, असे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी प्रसार माध्यमांना सांगितले. मग खड्डे बुजवणार नसणार, तर रस्त्यावर खड्ड्यांऐवजी मोठ मोठाले तलाव होण्याची वाट पाहात आहात का? जर काम एक लेनचे सुरू असेल, तर दुसऱ्या बाजूला खड्डे भरणार नाही, असाच काहीसा सूर रवींद्र चव्हाण यांचा वाटला. याचाच अर्थ, जोपर्यंत एका बाजूच्या लेनचे काम होत नाही, तोपर्यंत कोकणवासियांनी जीव मुठीत घेऊन प्रवास करायचा आहे.

Exit mobile version