लोकप्रतिनिधी व शासकीय अधिकाऱ्यांचे अक्षम्य दुर्लक्ष
| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यातील प्रसिद्ध श्रीक्षेत्र वैजनाथ ते गौळवाडी दरम्यानच्या मुख्य रस्त्याची सध्या अत्यंत दुरावस्था झाली असून, संपूर्ण रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. पावसामुळे या खड्ड्यांमध्ये पाणी साचत असल्याने रस्त्याची नेमकी खोली लक्षात येत नसून वाहनचालकांसाठी हा मार्ग अधिकच धोकादायक बनला आहे.
श्रीक्षेत्र वैजनाथ हे कर्जत तालुक्यातील प्रसिद्ध धार्मिक स्थळ असून, येथील शिवमंदिरात वर्षभर हजारो भाविक दर्शनासाठी येत असतात. त्यामुळे वैजनाथकडे जाणारा हा रस्ता धार्मिकदृष्ट्या तसेच स्थानिक वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. मात्र, रस्त्याची झालेली दुरावस्था पाहता भाविकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे.एखादी दुर्घटना घडल्यानंतरच प्रशासनाला जाग येणार का? असा संतप्त सवाल स्थानिक ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे. लोकप्रतिनिधी आणि संबंधित शासकीय विभागाच्या अधिकाऱ्यांनी या रस्त्याची प्रत्यक्ष पाहणी करून तातडीने दुरुस्तीचे काम हाती घ्यावे. अन्यथा एखादी गंभीर दुर्घटना घडल्यास त्याची जबाबदारी कोणाची, असा सवालही नागरिकांकडून उपस्थित करण्यात येत आहे.
तातडीने खड्डे बुजविण्याची मागणी..
श्रीक्षेत्र वैजनाथ येथे येणारे भाविक, स्थानिक ग्रामस्थ, पादचारी, शाळकरी विद्यार्थी तसेच वाहनचालकांच्या सुरक्षिततेचा विचार करून वैजनाथ-गौळवाडी मार्गावरील खड्डे तातडीने बुजवावेत आणि रस्त्याची कायमस्वरूपी दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
अपघाताची शक्यता; प्रशासन जागे होणार कधी?
रस्त्यावरील खड्ड्यांमुळे दुचाकीस्वारांना विशेष धोका निर्माण झाला आहे. पावसाच्या पाण्याखाली खड्डे दिसत नसल्याने वाहनांचे संतुलन बिघडण्याची शक्यता आहे. रात्रीच्या वेळी तर परिस्थिती आणखी गंभीर होत असून, योग्य प्रकाशव्यवस्था नसल्याने खड्ड्यांचा अंदाज घेणे वाहनचालकांना कठीण जाते.
शाळकरी विद्यार्थ्यांना सर्वाधिक त्रास…
या मार्गावरून परिसरातील अनेक गावांमधील शाळकरी विद्यार्थी दररोज पायी ये-जा करतात. रस्त्यावर मोठमोठे खड्डे आणि त्यामध्ये साचलेले पावसाचे पाणी यामुळे विद्यार्थ्यांना अत्यंत सावधपणे मार्गक्रमण करावे लागते. त्यातच एखादे वाहन खड्ड्यातून वेगाने गेल्यास साचलेल्या पाण्याचा आणि चिखलाचा फवारा थेट पादचारी तसेच विद्यार्थ्यांच्या अंगावर उडतो.यामुळे शाळेत जाताना विद्यार्थ्यांचे कपडे खराब होण्याबरोबरच त्यांना मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. तसेच वाहनचालकाचा ताबा सुटल्यास किंवा पादचारी खड्डा चुकवताना घसरल्यास गंभीर अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.







