4 जूनला देश मोदीमुक्त होणार

मुंबईतील सभेत इंडिया आघाडीचा निर्धार

| मुंबई | प्रतिनिधी |

दिल्लीचे तख्त काबीज करण्यासाठी महाराष्ट्राने वज्रमूठ आवळली आहे. ‘इंडिया’ आघाडीच्या भक्कम एकजुटीचे विराट रूप आज मुंबईत पाहायला मिळाले. महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या आणि शेवटच्या टप्प्यातील प्रचार तोफा उद्या थंडावत आहेत. त्याआधी महाविकास आघाडीची संयुक्त प्रचारसभा आज बीकेसीतील एमएमआरडीए मैदानावर झाली. या सभेला लाखोंचा जनसागर उसळला. याच जनसागराच्या साक्षीने मोदी सरकार आणि भाजपच्या हुकूमशाहीविरुद्ध वज्राघात करण्यात आला. हुकूमशहाच्या व्हायरसपासून देशाला वाचवण्यासाठी हिंमत दाखवा आणि फक्त एका बोटाने या हुकूमशहाला गाडून टाका, अशी साद यावेळी महाराष्ट्रातील तमाम जनतेला घालण्यात आली तेव्हा ‘हुकूमशहाला मोडीत काढणारच; 4 जूनला देश मोदीमुक्त होणारच, असा बुलंद नारा गर्दीतून घुमला. ‘मोदी चले जाव, अब की बार भाजप तडीपार’ असे ठणकावून सांगणारीच ही सभा होती.

महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांच्या साक्षीने विराट जनसमुदायाशी संवाद साधताना उद्धव ठाकरे म्हणाले, हुकूमशहाच्या व्हायरसपासून देशाला वाचवण्यासाठी हिंमत करून फक्त एका बोटाने या हुकूमशहाला गाडून टाका, आणि जिथे जिथे शिवसेनेची मशाल आहे ती मशाल यांच्या बुडाला अशी लावा की, पुन्हा हे महाराष्ट्रात येता कामा नयेत. जिथे काँग्रेसचा हात आहे तो हात यांच्यावर असा बसला पाहिजे, ते पुन्हा उठता कामा नयेत. आणि तुतारी अशी वाजली पाहिजे की, यांची भीतीने बोबडी वळली पाहिजे. एकजुटीने हुकूमशाहीविरुद्धचा लढा नुसता लढायचा नाही, तर तो जिंकायचा आहे. आणि तो जिंकणारच.

नरेंद्र मोदी यांचा खतरनाक प्लॅन सुरू आहे. ‘वन नेशन, वन लीडर’ त्यांना हवे आहे. त्यामुळे एकाधिकारशाही, हुकूमशाहीने ते सर्व विरोधकांना जेलमध्ये टाकतील, असे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल कडाडले. 75 वर्षे वयाची अट सांगत मोदींनी आडवाणींसह ज्येष्ठ नेत्यांना बाजूला केले. पुढील वर्षी 75 वर्षे झाल्यानंतर मोदी सत्ता सोडणार का, असा सवालही त्यांनी केला. दिल्लीत ‘आप’चे सरकार आल्यानंतर आम्ही वीज, पाणी, शिक्षण, औषधोपचार मोफत दिले. आता हे सर्व बंद करण्याचा डाव मोदींचा असल्याचेही ते म्हणाले.

बाळासाहेब ठाकरे यांनी तुम्हाला संकटाच्या काळात वाचवले त्या बाळासाहेबांना तुम्ही विसरलात, त्यांचा पक्ष फोडलात, अशा शब्दांत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोदींना सुनावले. बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जाणार्‍या उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी शक्ती उभी केल्याशिवाय राहणार नाही, असे त्यांनी मोदींना ठणकावले. मोदी आणि भाजपची हुकूमशाही, एकाधिकारशाही मोडीत काढून संविधान, लोकशाही आणि आपले मूलभूत हक्क वाचवण्यासाठी मोदी-भाजपला हटवावेच लागेल, असेही ते म्हणाले.

तुम्ही आमच्यावर भटकता आत्मा अशी टीका केली. या टीकेकडे महाराष्ट्रातील जनता ढुंकूनही पाहात नाही. मात्र एक लक्षात ठेवा ही भटकती आत्मा तुम्हाला सत्तेवरून बाजूला केल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. दिल्लीचा चेहरामोहरा बदलेल्या केजरीवाल यांना जाणीवपूर्वक जेलमध्ये टाकल्याचेही त्यांनी सांगितले. ही हुकूमशाही पद्धत आहे. जो सोबत येत नाही त्याला तुरुंगात टाकले जात आहे. मुख्यमंत्र्यांना आणि राज्यकर्त्यांना विविध प्रश्‍नावर धोरणं ठरवायची असतात. ती ठरवण्यासाठी केजरीवाल यांना तुरुंगात टाकलं. अनेक राज्यांच्या नेत्यांना तुरुंगात टाकलं. मी म्हणेन तीच पूर्व दिशा. मी म्हणजेच लोकशाही असं सुरू आहे. हे असंच सुरू राहिलं तर मोदी तुमचे आणि माझे अधिकार उद्ध्वस्त केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाहीत, असा इशारा देत देशाचे संविधान आणि लोकशाही वाचवण्यासाठी भाजपला सत्तेवरून दूर करावेच लागेल, असे आवाहनच त्यांनी जनतेला केले.

2014 पासून नरेंद्र मोदी खोटं बोलून जनतेची दिशाभूल करीत आहेत. 2014 मध्ये सगळ्यांच्या खात्यात 15 लाख देतो सांगून सत्ता मिळवली. 2019 मध्ये शहीदांच्या नावावर सत्ता मिळवली. बुलेट ट्रेन आली नाही, करोडो नोकऱ्याही आल्या नाहीत, मात्र बेरोजगारी आणि महागाई प्रचंड वाढल्याने सर्वसामान्यांना जगणे मुश्कील झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी झुठों के सरदार है. मोदींची घोषणा सब का साथ, सब का विकास नाही, तर सब का साथ, सब का सत्यानाश असल्याचा घणाघात काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केला.

‘इंडिया’ आघाडीला बदनाम करून पुन्हा एकदा सत्ता मिळवण्याचा मोदींचा प्रयत्न सुरू आहे. रोजगाराच्या नावाने जनतेची फसवणूक करणारे सरकार 30 लाख रिक्त पदे भरत का नाही? कारण यातील 15 लाख नोकर्‍या मागासवर्गीयांना मिळणार आहेत. मात्र मोदींना गरीब, मागासवर्गीय, आदिवासींचा तिटकारा असल्याने ही पदे भरली जात नाहीत, असेही ते म्हणाले. शेतकर्‍यांचे उत्पन्न दुप्पट करणार होते ते केले नाही. दोन कोटी नोकर्‍या देणार होते त्या दिल्या नाहीत. देशाला फसवून तुम्ही सत्ता मिळवली, असा टोलाही त्यांनी लगावला. आमच्या सत्ताकाळात 52 रुपयांचे पेट्रोल आता 92 रुपये झालेय, 414 रुपयांचा गॅस 903 रुपये, 39 रुपयांचे दूध 60 रुपयांवर गेले आहे.

‘…तर भाजपचे अस्तित्व राहणार नाही’: खर्गे 
केंद्रीय यंत्रणांच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांना तुरुगांत टाकण्याचे काम केले; पण देशात बांगलादेश आणि पाकिस्तानसारखी परिस्थिती होऊ देणार नाही. भाजप, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि नरेंद्र मोदींनी लाख प्रयत्न केले, राज्यघटना आम्ही बदलू देणार नाही. भाजपने तसे प्रयत्न केल्यास त्यांचे अस्तित्वच शिल्लक राहणार नाही, असा इशारा काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी शुक्रवारी दिला. ‘सब का साथ, सब का विकास’ म्हणणार्‍या भाजपने ‘सब का सत्यानाश’ केला, अशी टीकाही त्यांनी या वेळी केली.
…तोपर्यंत हा ‘आत्मा’ स्वस्थ बसणार नाही!: पवार
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पदावरून हटविल्याशिवाय हा भटकता आत्मा स्वस्थ बसणार नाही, असे प्रत्युत्तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोदींना दिले. लोकांचा सहभाग असलेल्या या निवडणुकीत भाजपचा पराभव अटळ असून, हुकूमशाहचा पराभव करून संविधान व लोकशाही वाचविण्याचा निर्धार इंडिया आघाडीच्या नेत्यांनी केला. महाराष्ट्रातील शेवटच्या टप्प्यातील निवडणुकीच्या निमित्ताने इंडिया आघाडीने जोरदार शक्तिप्रदर्शन केले. काही दिवसांर्पू्वी भटकती आत्मा अशी मोदींनी पवारांवर टीका केली होता. त्याला पवारांनी प्रचाराच्या अखेरीस उत्तर दिले.
Exit mobile version