संतापजनक! मृत महिलेचे एक महिन्यानंतर कोव्हिड यादीत नाव

रायगड जिल्हा आरोग्य विभागाचा भोंगळ कारभार; ग्रामस्थांमध्ये संताप

। मुरुड । संतोष रांजणकर ।

एक महिन्यापूर्वी मृत झालेल्या महिलेचे नाव एक महिना उलटल्यानंतर नवीन यादीमध्ये आले असल्याचा संतापजनक प्रकार मुरुडमध्ये घडला आहे. त्याचबरोबर तिच्या मुलाचे व सुनेचे देखील नाव आल्याने मृत महिलेचा मुलगा चंद्रकांत शांताराम पवार यांच्यासह एकदरा एकदरा ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे.

14 मे 2021 रोजी एकदरा गावातील एकाच घरातील तीन व्यक्तींना कोव्हिडचा प्रादुर्भाव झाला होता. यातील पार्वती शांताराम पवार या महिलेचा उपचारादरम्यान दिनांक 17 मे 2021 रोजी मृत्यू झाला. तिचा मुलगा चंद्रकांत शांताराम पवार व सून राजेश्री शांताराम पवार हे उपचार घेऊन बरे होऊन परतले. त्यांनी आईचे सर्व कार्य सुद्धा उरकले. त्यानंतर एक महिन्याने दिनांक 18 जूनच्या कोव्हिड रुग्णांच्या यादीत या तिन्ही व्यक्तींची नावे आल्याने एकदरा गावात खळबळ माजली आहे. यामुळे पवार कुटुंबीय मात्र संतप्त झाले आहेत.

यावरून असे स्पष्ट होते की, जिल्हा आरोग्य विभाग नवीन यादीत विनाकारण नावे वाढवून रायगड जिल्याच्या कोरोना रुग्णाच्या संख्येत वाढ दाखवून जनतेला वेठीस धरत आहेत. प्रशासन विनाकारण फिरणार्‍या लोकांना पकडून कोव्हिड तपासणी करत आहे. मास्कच्या नावाखाली पोलीस प्रशासन दंड वसूल करत आहेत. त्यामुळे नागरिक पुरते हैराण झाले आहेत.या संदर्भात चंद्रकांत शांताराम पवार यांची भेट घेवून विचारले असता त्यांनी एक महिन्यापुर्वी माझी आई मृत झाली व आम्ही पूर्ण बरे होऊन परत आलो तरीही पुन्हा कालच्या यादीत पुन्हा नाव आल्याने तीव्र संताप व्यक्त केला.

Exit mobile version