वाहनचालक, प्रवासी व नागरिकांचा सवाल
। कोर्लई । वार्ताहर ।
मुरुड-सुपेगांव-रोहा रस्त्यावर सुपेगाव ते तळेखार, फाट्यावर जाताना असलेला झाडाझुडुपांचा विळखा अपघाताला आमंत्रण ठरत असून तो हटविणार कधी? असा सवाल वाहनचालक, प्रवासी व नागरिकांतून विचारला जात असून संबंधित बांधकाम खात्याबाबत नाराजी व्यक्त केली जात आहे.
मुरुड-रोहा प्रवासात जवळचा मार्ग असलेल्या मुरुड तालुक्यातील सुपेगांव रस्त्यालगत अनेक ठिकाणी असलेला झाडाझुडपांचा विळखा आणि अरुंद रस्ता गेल्या तीन वर्षांपासून साईडपट्ट्या झाडाझुडुपांनी भरलेल्या असून त्या साफ करण्यासाठी मागणी केली जात आहे. अपघातानंतरच संबंधित बांधकाम खात्याला जाग येणार काय? असा सवाल विचारला जात आहे.
कोकणात भरपूर प्रमाणात पाऊस पडत असतो. गवत, झाडी झुडपे मोठ्या प्रमाणावर वाढत असतात, रस्त्याच्या दुतर्फा वाढलेली झाडी झुडपे हटविण्यासाठी बांधकाम खात्याकडे निधी वा तरतूद करण्यात येते काय? आणि जर का काही तरतुदी असतील तर या रस्त्यावरील सुपेगाव भागात तीन वर्षे ही समस्या भेडसावत आहे.याबाबत शासन स्तरावर वरीष्ठ अधिकारी लक्ष देतील काय? असा सवाल प्रवासी व वाहनचालकांकडून विचारला जात आहे. फणसाड अभयारण्य व मुरुड-जंजिरा पर्यटनात रत्नागिरी, पुणे, कोल्हापूर अन्य ठिकाणाहून काशिद-बिच, फणसाड अभयारण्य, मुरुड-जंजिरा किल्ला पाहाण्यासाठी रोहा सुपेगाव मार्गे मुरुड रस्ता जवळ असल्याने या रस्त्यावर शनिवार, रविवार व सुटीच्या दिवशी वाहनांची वाढती वर्दळ असते. मागील महिन्यापासून या रस्त्यालगत बर्याच ठिकाणी गवत वाढले असून झाडाझुडपांचा विळखा असून काही ठिकाणी रस्त्यावर झाडे झुकलेल्या अवस्थेत आहेत.काही फांद्या अवजड वाहनांना लागून तुटून अक्षरशः लोंबकळताहेत. काही वळणात विशेष करून आदाड फाट्यापासून सुपेगांव दोन्ही चढ उतारावर समोरून येणारे वाहन दिसत नसल्याने अपघाताची शक्यता नाकारता येत नाही.