दिघी-आगरदांडा प्रवास बनला संभ्रमाचा

दोन फेरी बोट मधील प्रवास दरात 50 रुपयांची तफावत
। दिघी । वार्ताहर ।
श्रीवर्धन व मुरुड या दोन तालुक्यातील प्रसिद्ध पर्यटनाला जोडणारा दिघी बंदरातील फेरी बोट प्रवास प्रवाशांसाठी सोइस्कर व पर्यटकांना आकर्षित करणारा ठरत आहे. मात्र, या जलवाहतूक प्रवासामध्ये दोन बोटीतील तिकीट दरातील फरकाने प्रवाशी वर्ग संभ्रमात पडला आहे. याबाबत मेरिटाईम बोर्डाकडे तक्रार करूनही दाद मिळत नसल्याने प्रवाशी संताप व्यक्त करत आहे.
आगरदांडा व दिघी बंदर हे दोन महत्वाचे बंदर आहेत. श्रीवर्धन, म्हसळा, मुरुड या तीन तालुक्याला जोडणारा जलमार्ग हा महत्वाचा दुवा आहे. त्यामुळे येथे दिवेआगर, श्रीवर्धन, हरिहरेश्‍वर, मुरूड, अलिबाग आदी नयनरम्य ठिकाणी येणार्‍या पर्यटकांची संख्या झपाट्याने वाढू लागल्यानंतर पर्यटन व्यवसायाच्या वाढीसाठी उपयुक्त ठरणारी जंगल जेटीची निर्मिती करण्यात आली. या जेट्टीवरून सुवर्णदुर्ग शिपिंग मारिन सर्व्हिसेस व दिघी जलवाहतूक संस्था या दोन संस्थेची अधिकृतरित्या दिघी ते आगरदांडा व आगरदांडा ते दिघी अशी फेरी बोट सेवा दिली जात आहे. दिघीहुन सुटणार्‍या जंगलजेट्टीमध्ये दुचाकी व सहा चाकी वाहन नेण्याची सुविधा असल्याने या मार्गाचा वापर वाहनधारकांकडून मोठ्या प्रमाणात होतो. मात्र, प्रत्येक प्रवासी भाडे व दोन बोटीमध्ये वाहन भाडे दरात फरक असल्याने प्रवाशांमध्ये संभ्रमाचा सावळा गोंधळ नेहमीच पाहायला मिळत आहे. तिकीट दरात आमची लूट होत असल्याचे आरोप प्रवाशांकडून करण्यात येत आहे.

दोन बोटीतील तिकीट दर
सुवर्णदुर्ग शिपिंग मारिन सर्व्हिसेस व दिघी जलवाहतूक या दोन संस्थेच्या फेरी बोट मधील प्रवासी भाडे 30 रुपयांनी सारखेच आकारले जाते. मात्र, मोटारसायकल सह चालक असे वाहनांसाठी आकारण्यात येणारे तिकीट दर एका बोटीतील 80 रुपये तर दुसर्‍या बोटीत 55 रुपये आहे. यामध्ये 25 रुपयांचा तफावत आहे. तर कार, ट्रक अशा अनेक विविध वाहनात अधिक फरक असल्याची प्रवाशांची ओरड आहे.

Exit mobile version